रत्नागिरीतल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. तर आतापर्यंत पोलिसांकडून या आंदोलकांविरोधात बळाचा वापर झाल्याचं निदर्शनास आलं आहे. दरम्यान, वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी या प्रकल्पावर आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी देखील याविषयी त्यांची भूमिका आज माध्यमांसमोर मांडली.
अजित पवार म्हणाले की, बारसू रिफायनरीप्रश्नी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. तसेच काल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पवार साहेबांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आमचा पक्ष विकासाआड नाही. परंतु विकास करताना पर्याावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जावी, आधी लोकांच्या मनातले प्रश्न निकाली काढावे.
हे ही वाचा >> विखे पाटलांच्या मुख्यमंत्रिपदावरून अब्दुल सत्तारांचं वक्तव्य, म्हणाले, “माझी छाती फाडून…”
अजित पवार म्हणाले, आधी एन्रॉन प्रकल्पालाही असाच विरोध झाला होता. भाजपा शिवसेनेने त्या काळी तो प्रकल्प आणला. त्यानंतर समृद्धी महामार्गालाही विरोध झाला होता. परंतु लोकांना योग्य मोबदला मिळाल्यावर विरोध दूर झाला. त्याप्रमाणे बारसूतील प्रकल्पाकडेही पाहता येईल. परंतु कोकणच्या निसर्ग सौंदर्यावर परिणाम न होता हा प्रकल्प पुढे न्यावा. आधी लोकांच्या मनातले गैरसमज दूर करावे, संवेदनशील मार्ग काढावा, त्यानंतर सरकारने हा प्रकल्प करावा.