मनसेच्या वतीने शुक्रवारी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दीपोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपा किंवा शिंदे गटाच्या युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत. दोन्ही बाजूंच्या नेतेमंडळींच्या भेटीगाठीही मधल्या काळात वाढल्यामुळे युतीच्या चर्चांना जास्तच उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर हे तिन्ही नेते एकत्र येणं आगामी युतीचीच नांदी असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीनिमित्त बारामतीत असलेले राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपा, शिंदे गट आणि मनसे यांची महायुती होणार का? अशी चर्चा सुरू असताना या तिन्ही पक्षांची नेतेमंडळी एकमेकांच्या भेटीगाठी करत आहेत. त्यामुळे लवकरच युतीची घोषणा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. तिन्ही पक्षांकडून याबाबत जाहीर टिप्पणी करणं टाळलं जात असलं, तरी युतीबाबत वरीष्ठ निर्णय घेतील, असं उत्तर येत आहे. त्यामुळे युतीच्या चर्चांना पूर्णविरामही देण्यात आलेला नाही.
बारामतीमध्ये कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी दाखल झालेल्या अजित पवारांनी शुक्रवारच्या दीपोत्सवाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “त्यांनी एकत्र येऊ नये का? तुम्हाला वाईट का वाटतंय? दिवाळीच्या काळात सगळ्यांनी एकत्र यावं. शुभेच्छा द्याव्यात. त्यात आक्षेप घेण्याचं काय कारण आहे?” अशी सूचक प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
१०० रुपयाच्या शिधाचा काळा बाजार?
दरम्यान, दिवाळीचा शिधा १०० रुपयांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबवण्यात सरकारला अपयश आल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. “योजना राबवत असताना त्याचं व्यवस्थित नियोजन करावंच लागतं. नियोजनशून्य कारभार केला, की अशा समस्या निर्माण होतात. काही गोष्टी आहेत, काही नाहीत. दिवाळी झाल्यानंतर सवलतीच्या दरातला शिधा मिळाला तर त्याचा काय उपयोग आहे? त्यांचे मंत्री सांगतायत की पोहोचलाय. पण अजिबात पोहोचलेला नाही. काहींनी सांगितलं की त्याचा काळा बाजार सुरू आहे. १०० रुपयांमधला शिधा कुणी २०० किंवा ३०० रुपयांना विकत आहे. हे चुकीचं आहे. त्यात बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे”, असं अजित पवार म्हणाले.