ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ वृत्तपत्रातील अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे. ईडी, सीबीआयसह इतर तपास यंत्रणांच्या भीतीपोटी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपाबरोबर जाण्याच्या तयारीत होता. पण शरद पवारांनी राजीनामा देत बंडखोरीची योजना हाणून पाडली, अशा आशयाची टीका संजय राऊतांनी केली.
राऊतांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एखादी व्यक्ती मनाला वाटेल तसं काहीही बोलत असेल तर त्यांच्या मताला महत्त्व देण्याचं काहीही कारण नाही, असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं. तसेच ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांचं मत म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचं मत, असं असू शकत नाही, असा टोलाही अजित पवारांनी लगावला. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- “…तर १६ आमदार अपात्र ठरतील”, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी विधानसभा उपाध्यक्षांचं मोठं विधान!
राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित बंडखोरीबाबत’सामना’ वृत्तपत्रातील दाव्याबद्दल विचारलं असता अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपाबरोबर जाण्यासाठी बॅगा भरून तयार होता, असं त्यांनी (संजय राऊत) सांगितलं आहे. त्यावर शरद पवारांनी काय सांगितलं? हे तुम्ही ऐकलं का? आमच्या राष्ट्रीय नेत्याने सांगूनही कुणी त्यांच्या मनाला वाटेल तसं बोलत असेल तर त्याला महत्त्व द्यायचं काहीही कारण आहे, असं मला वाटत नाही.”
हेही वाचा- “…तरच अजित पवार भाजपाबरोबर जाऊ शकतील”, विधानसभा उपाध्यक्षांचं थेट विधान!
अजित पवार पुढे म्हणाले की, ‘सामना’च्या संपादकांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. त्याचं मत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं मत नसतं, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. जेवढ्या व्यक्ती असतील, तेवढी वेगवेगळी मतं असू शकतात. त्यामुळे त्यांचं मत तसं असलं तरी महाराष्ट्रातील जनतेचं तसं मत नाहीये.