विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. आज ( ११ फेब्रुवारी ) पैठणमध्ये बोलताना अजित पवारांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत समाचार घेतला. पैठण तालुक्यात साखर कारखाने, आपेगाव विकास प्रतिष्ठान, एमआयडीसी, महाविद्यालय हे सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं आहे. भुमरेंनी काय दिलं?, असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे.
एका सभेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, “पैठण तालुक्याला जायकवाडी धरण, दोन सहकारी साखर कारखाने, संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठणचं आपेगाव विकास प्रतिष्ठान, एमआयडीसी, महाविद्यालय हे सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं आहे. भुसरेंनी काय दिलं? याचा लोकांनी विचार करायला हवा. पाच वर्षे निघून जातात. एकदा शेतकऱ्यांचं पिक उद्ध्वस्त झालं, तर तीन वर्षे शेतकरी उमजत नाही. एक आमदार चुकीचा निवडला, तर पुढं तुमचं वाटोळं होतं,” असा खोचक टोला अजित पवारांनी भुमरेंना लगावाल आहे.
हेही वाचा : “देवेंद्र फडणवीसांच्या आंगणेवाडीतील सभेनंतर…”, शशिकांत वारीसे मृत्यूप्रकरणी काँग्रेसने व्यक्त केला संशय!
“पैठण तालुक्यात शाळा, मेडिकल कॉलेज, रुग्णालय, साखर कारखाने, रस्ते होण्याची अपेक्षा होती. पण, मंत्री आणि पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर ९ दारूची दुकाने उघडली. दुकानासमोर गतिरोधक बसवलं. का तर… गाडी थांबावी आणि गिऱ्हाइकाने थांबत टाकून जावं… उलट लहान मुले-मुलींना त्रास होऊ नये म्हणून शाळा जवळ गतिरोधक बसवतो. मात्र, या पद्धतीने स्वत:ची दुकाने चालवण्यासाठी गतिरोधक बसवता. कुठे फेडाल हे पाप…तळतळात लागेल,” अशी मिश्कील टिप्पणी अजित पवारांनी केली.