Ajit Pawar on Uday Samant : दावोस येथे होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) हजेरी लावण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे दाखल झाले आहेत. यांनंतर इकडे राज्यात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी त्यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. भाजपा आता एकनाथ शिंदे यांना बाजूला करेल. तसेच शिवसेनेत आात नवा ‘उदय’ होईल, असं विरोधकांचं म्हणणं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही फुटीची शक्यता विरोधकांनी वर्तवली असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

विजय वडेट्टीवार आणि राऊतांच्या दाव्यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी हे खोटं असल्याचं स्पष्ट केलं. अजित पवार म्हणाले की, “ह्याला काही अर्थ नाही. तथ्यहीन बातम्या आहेत. उगाच कारण नसताना अशा प्रकारच्या बातम्या पसरवून देणं बरोबर नाही”.

पुढे बोलताना अजित पवारांनी विरोधकांच्या दाव्यांबद्दल बोलताना उदाहरण देखील दिलं. ते म्हणाले की, “मी बारामतीला होता, तेव्हा सैफच्या घरावर हल्ला झाला होता. त्यानंतर मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळल्याबद्दल अनेक बातम्या देण्यात आल्या होत्या. पण आरोपीला पकडल्यानंतर लक्षात आलं की तो बांगलादेशातून कलकत्त्यात आला, तेथून मुंबईला आला. तिथं हाऊसकिपींगचं काम काही दिवस केलं. तो काही सराईत गुन्हेगार देखील नव्हता. तो अचानक त्या बिल्डिंगमध्ये शिरला. वास्तविक बिल्डिंगने अंतर्गत बंदोबस्त ठेवण सौसायट्यांचा अधिकार आहे. बाहेर काही झालं तर पोलीस यंत्रणा काम करते”, असे अजित पवार म्हणाले.

धनंजय मुंडे बीडचे शॅडो पालकमंत्री?

बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. यावरून आता शॅडो पालकमंत्री हे धनंजय मुंडे असतील अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल विचारण्यात आले असता अजित पवार म्हणाले की, “तुम्ही अजित पवारला किती वर्षांपासून ओळखता? खूप वर्ष… अजित पवार कसं वागतो? मी तिथं गेल्यावर लोकांना कळेल”.

वडेट्टीवार काय म्हणाले?

“मी एक वक्तव्य करत आहे. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना संपवून एकनाथ शिंदे यांना पुढे आणलं. त्याचप्रमाणे आता एकनाथ शिंदे यांना संपवून उद्या एक नवीन उदय पुढे आणला जाईल. तो उदय कुठला असेल ते मी सांगत नाही. मात्र त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळेल”. यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी विजय वडेट्टीवार यांना विचारलं की, “तुम्हाला उदय सामंत यांचा उल्लेख करायचा आहे का?’ त्यावर, वडेट्टीवार म्हणाले, “उद्याचा शिवसेनेचा तिसरा उदय असेल. तुम्हाला नवा उदय दिसू शकतो आणि ही शक्यता नाकारता येत नाही. कारण काही उदय दोन्ही दगडांवर पाय ठेवून उभे आहेत. त्यांनी दोन्ही बाजूंशी सुंदर संबंध निर्माण करून ठेवले आहेत आणि हे प्रयत्न उद्यासाठीच आहेत”.

संजय राऊत काय म्हणाले होते?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते आणि मंत्री उदय सामंत दावोसला गेले आहेत. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंतांना दावोसला नेलंय. माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्याबरोबर २० आमदार आहेत. सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदावरून जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच हा उदय होणार होता. पण एकनाथ शिंदे सावध झाले”.

Story img Loader