राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषणाच्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यपदावरून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. अनेक दिग्गज नेतेमंडळींना यावेळी अश्रू अनावर झाले. अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांपाठोपाठ आपणही राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकीकडे शरद पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न करत असताना दुसरीकडे कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर आंदोलन करत आहेत. याचदरम्यान एका कार्यकर्त्याने शरद पवारांच्या नावाने घोषणा देताच अजित पवारांनी त्याच्या डोक्यावर टपली मारली. नेमकं काय घडलं?
शरद पवारांनी अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर करताच सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यासाठी त्यांची मनधरणीही सुरू केली. मात्र, शरद पवारांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. असं असताना कार्यकर्ते आंदोलनावर ठाम असताना अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका कार्यकर्त्याने अचानक शरद पवारांच्या नावाने घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी अजित पवारांनी त्याला टपली मारत त्याला समज दिली.
Video: अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाचं केलं समर्थन; रडणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावत म्हणाले…!
नेमकं घडलं काय?
सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. “याबाबत आमची विनंती आहे की तुम्ही जाऊन काहीतरी खाऊन परत या. आम्हाला साहेबांचा (शरद पवार) फोन आला की कार्यकर्त्यांना जेवायला पाठवा. त्यांना राजी करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय. त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांना काहीतरी खाऊन येऊ द्या. त्यांनाही हट्टीपणा करता येतो. ते जर म्हणाले की हे आंदोलन थांबवत नाहीत तोपर्यंत मी माघार घेणार नाही, तर काय करणार आहात तुम्ही?” असा प्रश्न अजित पवारांनी यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारला.
राष्ट्रवादीच्या पुढील अध्यक्षाची निवड कशी आणि कोण करणार? शरद पवार माहिती देत म्हणाले…
यावेळी सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांचं थेट शरद पवारांशीही फोनवर बोलणं करून दिलं. शरद पवारांनी कार्यकर्त्यांना जेवण करण्यास सांगितलं आणि त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्याचं आश्वासनही यावेळी दिलं.
अजित पवार म्हणाले, “आरे भारताचा बुलंद आवाज म्हण!”
दरम्यान, ही चर्चा चालू असतानाच खाली बसलेल्या एका कार्यकर्त्याने शरद पवारांच्या नावाने घोषणा दिली. “महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार”, असं हा कार्यकर्ता म्हणाला. तेवढ्यात त्याच्याकडे रोखून बघणाऱ्या अजित पवारांनी लागलीच त्याच्या डोक्यावर टपली मारली. “आरे भारताचा बुलंद आवाज म्हण”, असं आजित पवार त्या कार्यकर्त्याला म्हणाले आणि हसत तिथून निघाले. त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्येही हास्याची लकेर उमटली.