Ajit Pawar on Swargate Rape Case : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून बसने गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. बुधवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला ताब्यात घेतलं असून शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. पुणे न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शिरुरमधून त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात दत्ता गाडे याच्याबरोबर त्याचे आणखी साथीदार आहेत का याचा तपास करायचा आहे. तसेच पोलिसांना दत्ता गाडेचा मोबाईल हस्तगत करायचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, या बलात्कार प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधक राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बलात्कार प्रकरणावर भाष्य केलं आहे. शुक्रवारी नांदेड येथील एका कार्यक्रमात त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं.

अजित पवार नांदेड येथील पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “मी आज सकाळी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. मी त्यांना म्हटलं की स्वारगेटला जे काही झालं ते चुकीचंच आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळाच्या आसपासचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमधून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. पोलीस चौकशीत आरोपीचा जबाब, इतर साक्षी-पुरावे पोलिसांकडे आहेत. आरोपीला कठोर शासन होईल. तसेच आपल्या राज्यातली प्रत्येक मुलीचं, बहिणीचं, महिलेचं संरक्षण व्हायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवलेल्या वाटेवर आपण चालायचं आहे.

नांदेडमधील कार्यक्रमाद्वारे मोहनराव हंबर्डेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) नांदेडमधील कार्यक्रमात नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याबाबत अजित पवार म्हणाले, मी मोहनराव यांच्यासह सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या प्रवेशामुळे नांदेडमध्ये पक्षाची ताकद नक्कीच वाढली आहे. पक्षाचं जनकल्याणाचं कार्य पुढे नेत असताना मोहनराव यांचा दांडगा जनसेवेचा अनुभव कामी येईल.