ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणामुळे ठाण्यासह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांवर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभलाय” असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी “मै फडतूस नही, काडतूस हू… झुकेगा नही, घुसेगा साला” असं प्रत्युत्तर दिलं. यानंतर “फडतूस आणि काडतूस” शब्दाचा वाद वाढतच गेला. यानंतर आता विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘फडतूस आणि काडतूस’ वरील वादावरून उद्धव ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता निशाणा साधला.

हेही वाचा- “हा काय घाणेरडा प्रकार आहे?” आंबेडकर जयंतीनिमित्त लावलेल्या बॅनरवरून आव्हाडांचा बावनकुळेंना संतप्त सवाल

साताऱ्यातील एका कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार म्हणाले, “काहींना माईक हातात आल्यावर काय बोलावं? तेच कळत नाही. कोण फडतूस म्हणतं, तर कोण काडतूस म्हणतं. कुणी काहीही म्हणतं. अरे आपल्याला यशवंतराव चव्हाणांनी चांगले विचार दिले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात यशवंतराव चव्हाणांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची निर्मिती केली. त्या रस्त्याने आपण जायला हवं. वसंतदादा नाईक, शरद पवार यांनी दाखवलेल्या रस्त्याने आपण जायला हवं. तो रस्ता आपल्या भल्याचा आहे. आपल्याला निश्चितपणे दिशा देणारा आहे. त्याचा विचार आपण करायला हवा. या गोष्टी सोडून राज्यात नको त्या गोष्टी सुरू आहेत.”

हेही वाचा- “शरद पवार नास्तिक आहेत, म्हणून…”, अयोध्या दौऱ्यावरून केलेल्या टीकेला विजय शिवतारेंचं प्रत्युत्तर

अजित पवारांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अलीकडेच शरद पवारांनी अदाणी प्रकरणावर मतप्रदर्शन केलं होतं. हिंडेनबर्ग कंपनीच्या अहवालात अदाणींना लक्ष्य केल्याचं दिसतं, असं विधान केलं होतं. यानंतर आता अजित पवारांनी अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar on uddhav thackeray and devendra fadnavis statement about fadtus and kadtus rmm
Show comments