Ajit Pawar in Beed : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार हे आज (२ एप्रिल) बीड दौऱ्यावर असणार आहेत. मात्र, अजित पवारांच्या या दौऱ्यावेळी जिल्ह्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित नसतील. धनंजय मुंडे यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली आहे. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून धनंजय मुंडे हे राजकीयदृष्ट्या फारसे सक्रीय दिसले नाहीत. आज अजित पवारांच्या दौऱ्यात सहभागी होऊन ते परत सक्रीय होतील, असं बोललं जात होतं. मुंडे अजित पवारांच्या स्वागताला हजर असतील असं पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी म्हटलं होतं. मात्र, मुंडे या दौऱ्यावेळी उपस्थित नसतील, असं त्यांनी स्वतःच स्पष्ट केलं आहे.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर इतरही काही आरोप केले जात होते. याचदरम्यान, विरोधक व राज्यातील जनतेकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती. त्यानंतर प्रकृतीचं कारण सांगत मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

धनंजय मुंडे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बीडमधील नियोजित दौऱ्यात मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, ही विनंती.

“दोन दिवसांपूर्वी गुढीपाडव्यानिमित्त परळीतील अनेक दुकाने व एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी धनंजय मुंडे हजर राहिले होते. त्यामुळे ते अजित पवारांच्या दौऱ्यावेळीही उपस्थित असतील, अजित पवारांबरोबर बीडमधील त्यांच्या नियोजित कार्यक्रमांत दिसतील”, असं सुरज चव्हाण यांनी म्हटलं होतं. मात्र आता धनंजय मुंडे हे अजित पवारांबरोबर दिसणार नाहीत.