गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, अजित पवारांनी भूमिका स्पष्ट करत चर्चेला स्वल्पविराम दिला. अशातच अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठा दावा केला आहे. आगामी २०२४ च्या निवडणुकीनंतर काय, आता म्हटलं तरी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला १०० टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावर आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “मुख्यमंत्री होण्यास कोणाला आवडणार नाही. अजित पवारांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते अनेक वर्षापासून राजकारणात असून, मंत्रीही होते. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं. अनेकजण जुगाड करून लायकी नसताना मुख्यमंत्री होतात,” असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.

“अजित पवारांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा व्यक्त केली नाही. त्यामुळे अजित पवारांना माझ्या शुभेच्छा आहेत,” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांनी जळगावच्या सभेत चौकटीत बोलावं, नाही तर सभा उधळून लावू, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला होता. यावर प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “आम्ही काल जळगावात आल्यानंतर रेल्वे स्टेशनवर शिवसैनिकांची गर्दी होती. या गर्दीत कुठं उंदीर घुसलाय का? आम्ही बघत होतो,” असा टोला गुलबराव पाटलांना संजय राऊतांनी लगावला.

‘संजय राऊतांमुळेच महाविकास आघाडीत फूट पडेल,’ अशी टीका भाजपाचे खासदर अनिल बोंडे यांनी केली होती. त्यालाही संजय राऊतांनी प्रत्त्युतर दिलं. “महाविकास आघाडीत फूट पडलेली नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे. खरं तर मी बोलतो, त्याची भाजपाच्या लोकांना पोटदुखी आहे. मुळात अनिल बोंडे यांना उत्तर द्यावं, इतके ते मोठे नाहीत.”