आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी करण्याचा निर्णय घेताना भविष्यात यात आणखी वाढ करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिला होता. हा शब्द अजित पवार यांनी पाळला असून आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ केली आहे, त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी चार कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. अजित पवार यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल सत्ताधाऱ्यांसह विरोधी आमदारांच्यात सुध्दा आनंदाचे वातावरण असून दसऱ्याच्या पूर्वसंध्येला त्यांना मोठे गिफ्ट मिळाले आहे.
गेल्या दीड वर्षापासून राज्यासह देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खासदारांचा विकास निधी गोठवला आहे. त्यामुळे स्थानिक विकास कामांसाठी खासदारांच्याकडे कोणताही निधी उपलब्ध नाही. तर राज्यातल्या आमदारांच्या स्थानिक विकास निधीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक कोटीची वाढ करुन तो तीन कोटी करण्याची घोषणा सभागृहात केली होती, तसेच भविष्यात या आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी वाढ करण्याचा शब्द दिला होता. हा शब्द पाळताना अजित पवारांनी आमदारांचा विकास निधी चार कोटी रुपये केला आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ केल्यामुळे सामान्य जनतेच्या विकासांची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा