Ajit Pawar in Delhi for Mahayuti Meeting: २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. सत्ताधारी महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं. राज्यात महायुतीच्या २३५ जागा निवडून आल्या. महाविकास आघाडीला ४९ जागांवरच समाधान मानावं लागलं. पण निकाल लागल्यानंतर आज पाच दिवस उलटूनही राज्यात सत्तास्थापनेच्या ठोस अशा हालचाली दिसत नसल्याने सगळेच संभ्रमात पडले आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांनीही भाजपा मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं जाहीर केलं असताना अद्याप भाजपाकडून त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याचदरम्यान अजित पवारांनी सत्तेचं स्वरूप कसं असेल, याबाबत मोठं विधान केलं आहे.
रात्री ९ वाजता बैठक होणार, तिथेच फैसला होणार!
आज अजित पवार दिल्ली दौऱ्यावर असून एका बैठकीसाठी आपण दिल्लीला आलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत भूमिका मांडली. “आज रात्री बहुतेक ९ वाजता एकनाथ शिंदे, मी, देवेंद्र फडणवीस आणि तिन्ही पक्षांचे प्रमुख सहकारी अशी आमची बैठक होईल. त्या बैठकीत पुढील गोष्टींबाबत निर्णय होईल”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
राज्याच एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री!
दरम्यान, महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असतील हा फॉर्म्युला ठरल्याचं अजित पवारांनी केलेल्या उल्लेखावरून स्पष्ट झाल्याचं दिसत आहे. “आम्ही एकत्र चर्चा करून पुढे काय करायचं यावर निर्णय घेऊ. मंत्रिमंडळ कसं असेल, त्यात मुख्यमंत्री व इतर दोन उपमुख्यमंत्री याबाबत साधक-बाधक चर्चा होईल. त्यातून सत्तास्थापनेबाबत बरंच अंतिम स्वरूप येईल”, असं ते म्हणाले.
“आम्ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात खातेवाटप, पालकमंत्रीपदं, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती यांची निवड यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. आमच्यात पूर्णपणे एकवाक्यता असून कोणतेही मतभेद नाहीत. पदांबाबतची कोणतीही चर्चा आम्ही कुणाशीच केलेली नाही”, असंही त्यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाला पाठिंबा
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासाठी भाजपाला पाठिंबा असल्याच्या भूमिकेचा अजित पवारांनी पुनरुच्चार केला. “कोण कुठल्या पदासाठी आग्रही आहे या चर्चेला काहीही अर्थ नाही. राज्यात महायुतीचं सरकार आणण्याचं लक्ष्य आम्ही पूर्ण केलं आहे. एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह घेतील तो निर्णय मान्य असेल. राष्ट्रवादी काँग्रेसनं निकाल जाहीर झाल्यानंतर हे जाहीर केलं होतं की भाजपा व त्यांचे नेते जो व्यक्ती ठरवतील त्या नेत्याला आम्ही मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देऊ”, असं ते म्हणाले.