बारामती : मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या बैठका अजित पवारांनी घ्यायला सुरुवात केली, अशा बातम्या दिल्या गेल्या. मी अर्थमंत्री आहे. मुख्यमंत्र्यांचा व्याप मोठा असतो. त्यांच्यावरील काम हलके करण्यासाठी, मी आणि देवेंद्र फडणवीसांनी बैठका घेतल्या आणि मुख्यमंत्र्यांना सांगितले, तर कामे लवकर मार्गी लागतील. तर काय बिघडलं? मुख्यमंत्र्यांचा त्याला पाठिंबा आहे. पण, इतरांच्या पोटात दुखते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी विरोधकांवर टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष असलेल्या काही बैठका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्या होत्या. यामुळे विरोधकांनी सरकारमध्ये अंतर्गत वाद असल्याची टीका केली होती. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात मतभेदाची चर्चा सुरू झाली होती. या टीकेचा अजित पवार यांनी बारामती येथील सभेत समाचार घेतला.
आढावा घेतल्याशिवाय कामाची अडचण कशी कळणार?, अडचण कळली, तर मला अर्थसंकल्पात तरतूद करता येईल. केंद्राची अडचण असेल, तर ती दूर करता येईल. एकनाथ शिंदे यांचा त्याला पाठिंबा आहे पण इतरांच्या पोटात दुखते, असे अजित पवार यांनी सांगितले.
घरातल्या लोकांसमोर काय बोलावे?
घरातल्या लोकांसमोर औपचारिक काय बोलावे, असा प्रश्न माझ्यासमोर आहे. पाचव्यांदा मला उपमुख्यमंत्रिपदाची संधी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे, असे सांगून अजित पवार म्हणाले, की राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून काम करणारे ज्येष्ठ नेते आज सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत. आपल्यातल्या सहकाऱ्यांनी वेगवेगळय़ा खात्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. महापुरुषांच्या विचारांनी आपल्याला पुढे जायचे आहे. मंत्रिमंडळात मागासवर्गीयांचा, मुस्लिमांचा, ओबीसींचा आणि महिलेचा समावेश केला आहे. सगळय़ा घटकांना सामावून घेण्याचा मी प्रयत्न केला आहे.
‘फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार कृतीतून हवा’
शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार मी पुढे घेऊन चाललो आहे. हे कृतीतून दिसले पाहिजे. केवळ भाषणातून नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. भूमिका समजून सांगण्यासाठी मी राज्यभर फिरणार आहे. राज्यातील एकाही घटकाला असुरक्षित वाटता कामा नये. जोपर्यंत आम्ही मंत्रिमंडळामध्ये आहोत, तोपर्यंत कुठल्याच घटकावर अन्याय होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.