शिंदे-भाजपा सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पहिला अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि अन्य घटकांसाठी मोठ्या तरतूदी करण्यात आल्या. या अर्थसंकल्पावर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘गाजर हलवा’ म्हणत टीका केला. पण, उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या हावभावावरून चर्चांना उधाण आलं आहे.
अर्थसंकल्प मांडल्यावर अजित पवार माध्यमांशी संवाद साधत होते. तेव्हा तिथे उद्धव ठाकरे आले. अजित पवार बाजूला झाले आणि उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नेमकं त्यावेळी अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध दिशेला पाहून कोणाला तरी डोळा मारला. अजित पवारांनी डोळा कोणाला मारला आणि कशासाठी मारला हे कळू शकलं नाही. मात्र, या प्रसंगाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा : “भाजपानेही हे लक्षात ठेवावं…”, वर्धापन दिनी राज ठाकरेंचा इशारा
दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले, “यापूर्वीचे दोन ते तीन अर्थसंकल्प महाविकास आघाडीच्या सरकारने मांडले होते. करोनाचे संकट होतं आणि केंद्र सरकार आमच्या बाजूचं नव्हतं. प्रत्येकवेळी २५ हजार कोटींची जीएसटी थकबाकी असायची. आता सहा महिने झालं, महाशक्तीचा पाठिंबा असलेलं सरकार आलं आहे. पण, राज्य कारभार कसा चालू आहे, हे सर्व पाहत आहेत.”
हेही वाचा : “आपण सत्तेपासून दूर नाही, हे मळभ…”, राज ठाकरेंचं सूचक विधान
“अर्थसंकल्पात सर्व समाजातील घटकांना मधाचं बोट लावण्याचं काम झालं आहे. त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झाला. अवकाळी पाऊस पडल्यावर मुंबईत गडगडात झाली, पण पाऊस पडला नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प गरजेल तो बरसेल अशा परिस्थितीचा आहे. एका वाक्यात सांगायचं तर ‘गाजर हलवा’, असं अर्थसंकल्पाचं वर्णन करेल,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.