Ajit Pawar on Parth Pawar Marriage : राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांचा धाकटा पुत्र जय पवार यांचा काल (१० एप्रिल) थाटामाटात साखपुडा विधी संपन्न झाला. या साखरपुड्याचे अनेक फोटो आता समोर आले असून सोशल मीडियावर या फोटोंची तुफान चर्चा आहे. दरम्यान, शरद पवारांसह सुप्रिया सुळेही यांनीही राजकीय मतभेद बाजूला सारून या साखरपुड्याला हजेरी लावली होती. त्यामुळे शरद पवारांच्या एन्ट्रीचीही चर्चा आहे. जय पवारांचा साखरपुडा तर झाला, आता पार्थ पवारांचा कधी असाही प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. यावर अजित पवारांनी अत्यंत मिश्किल शब्दांत उत्तर दिलंय. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

पार्थ दादा जय पवारांपेक्षा मोठे आहेत. मग त्यांचं लग्न कधी? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार म्हणाले, “काय आहे ना, जयने त्याचं लग्न ठरवलं. आता पार्थने ठरवलं की त्याचंही करू.” अजित पवारांच्या या उत्तराने पत्रकारांमध्येही हशा पिकला.

जय पवारांच्या साखरपुड्याला शरद पवारांची हजेरी

काल सायंकाळी जय पवार यांचा ऋतुजा पाटील यांच्याशी साखरपुडा विधी संपन्न झाला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यानुसार शरद पवारांनी आपल्या नातवाच्या साखरपुड्याला हजेरी लावलेली दिसतेय. महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांना आणायला खुद्द अजित पवार गेटपर्यंत गेले होते. अजित पवार, पार्थ पवार यांनी शरद पवारांचं स्वागत केलं. अजित पवारांच्या या कृतीने अवघ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. शरद पवारांच्या एन्ट्रीचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, सुप्रिया सुळेंनीही या शाही सोहळ्यातील कौटुंबिक फोटो शेअर केले असून यामध्ये पवार कुटुंबातील अनेक मंडळी एकत्र दिसत आहेत. पार्थ पवार, जय पवार, होणाऱ्या सूनबाई ऋतुजा पाटील आणि सुप्रिया सुळे असा एकत्र कौटुंबिक फोटोही राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. यानिमित्ताने राजकीय मतभेद दूर सारून पवार कुटुंब एकत्र आल्याचे म्हटलं जातंय.