विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध मुद्द्यांवर त्यांची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या शिवरायांबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली. राज्यपालांचे विधान हे निषेधार्ह असून राज्यातील प्रत्येकाला चीड आणणारे आहे, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी राज्यापालांच्या भेटीबाबतचा प्रसंगही सांगितला.
हेही वाचा – प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येणार? अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले…
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
“राज्यपालांनी शिवरायांबाबत जे वक्तव्य केलं, ते राज्यातील कोणालाही चीड येईल, अशा प्रकारचं होतं. त्या वक्तव्याचा मी पण निषेध नोंदवला होता. मी आजही त्याचा निषेध करतो. मात्र, ते वारंवार असं का वागतात, असं का बोलतात? हे महाराष्ट्राला पडलेलं कोडं आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
“मी सुद्धा उपमुख्यमंत्री असताना राज्यपालांना अनेकदा भेटायला जात होतो. तेव्हा ते नेहमी मला म्हणायचे ‘अजितजी बस्स मुझे नही रहना यहाँ, मुझे जाना है’ तेव्हा मी त्यांना म्हणायचो की, वरिष्ठांना सांगा आणि जा, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातून जायचं असेल म्हणून ते अशी विधानं करत असावेत, असा माझा अंदाज आहे, असेही ते म्हणाले. ज्याप्रकारे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना बदली हवी असेल तर काही वेडं वाकडं काम करतात आणि त्यानंतर त्यांची बदली केली जाते, तसं काही मनात आहे का, अशी शंका मला वाटते”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – ‘हा यू टर्न आता चालणार नाही’; सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना उद्देशून विधान!
“राज्यपालांनीही जे वक्तव्य केलं आहे, मला एवढचं म्हणायचं आहे. राज्यपालांच्या विचारामधला अंधार दूर होऊ दे, त्यांच्या वक्तव्यामधला गोंधळ संपू दे, महाराष्ट्राच्या राज्यपालांना सद्बुद्धी लाभू दे अशी प्रार्थना मी करतो”, असेल ते म्हणाले.