मागील जवळपास तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. यामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये एका जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली. एवढंच नव्हे तर आरोपींनी पीडित महिलांवर सामुदायिक बलात्कार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेचं कुणीच समर्थन करू शकणार नाही. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या लोकांना कडक शासन झालं पाहिजे, अशी मागणी अजित पवारांनी केली. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर अजित पवारही उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अजित पवारांनी पुण्यात मणिपूर हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा- “शरद पवारांची भूमिका…”, पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यावरून काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

यावेळी अजित पवार म्हणाले, “देशाचे पंतप्रधान कुणीही असले तरी त्यांना भारतात सगळीकडे चांगलं वातावरण राहावं, असंच त्यांना वाटत असतं. कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांना किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असंच वाटतं की, आपल्या इथे कायदा व सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे. लोकांमध्ये सुरक्षितेचं वातावरण राहिलं पाहिजे. पण मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेचं कुणीचं समर्थन करणार नाही. ती माणुसकीला काळीमा फासणारीच घटना आहे. त्याची नोंद सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी घेतली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यावर प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे.”

हेही वाचा- मंचावर शरद पवारांशी हातमिळवणी न करता निघून का गेलात? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“देशातील विविध भागात या प्रकरणाचा निषेध केला आहे, ते आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. भारतीय संस्कृतीत महिलांना आदराचं स्थान आहे. महिलांना आपण सन्मानाने वागणूक देतो, हाच आपल्या सर्वांचा इतिहास आहे. असं असताना आपल्या भारतात जे घडलं ते सर्वांसाठी मान खाली घालायला लावणारी घटना आहे. जगानेही या घटनेची नोंद घेतली. जगभरातील विविध देशांतील नेत्यांनी त्यावर आपापली भूमिका मांडली. यामध्ये जो दोषी आहे, त्यांना कडक शासन झालं पाहिजे. त्यानंतर असं कृत्य करण्याचं कुणाचंही धाडस झालं नाही पाहिजे, असा संदेश यातून गेला पाहिजे. याची खबरदारी केंद्र आणि राज्य सरकार घेत आहे”, असंही अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar reaction on manipur violence after met pm narendra modi pune visit rmm