अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके सध्या चर्चेत आहेत. अहमदनगर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छूक असून त्यासाठी ते शरद पवार गटात जाणार असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “निलेश लंके स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांनी एका मंत्र्यांविरोधात माझ्याकडे तक्रार केली. त्यांच्यासमोर सतत अडचणी येत आहेत. मी त्यांना आश्वासित केलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि आपण एकत्र बसू. तुम्हाला ज्या मंत्र्यामुळं त्रास होतो, त्यांनाही आपण बोलवुया. जे समज-गैरसमज झाले असतील ते सोडवुया. पण तू व्यवस्थित राहा, चुकीचा निर्णय घेऊ नको, अशी मी त्यांची समजूत घातली होती”, असे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच त्यांना जर राष्ट्रवादीतून बाहेर पडायचे असेल तर काय होईल, हेदेखील अजित पवार यांनी सांगितले.
आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “शरद पवार गटात प्रवेश…”
माध्यमांना प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “निलेश लंके आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यांना व्हिप लागू झालेला आहे. त्यांनी जर स्वतः वेगळा निर्णय घेतला तर त्यांना राजीनामा देऊनच निवडणुकीला उभं राहावं लागेल.”
विरोधकांकडे लोकसभेसाठी उमेदवार नसल्यामुळं निलेश लंकेंना स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. २ जुलै २०२३ रोजी जेव्हा आम्ही भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस शरद पवार गटातीलच काही लोक म्हणत होते की, जे बाहेर गेले त्याच्यातल्या एकालाही परत घ्यायचं नाही. ही घोषणा करून सहा महिने होत नाही, तोपर्यंत निलेश लंके यांना कुरवाळण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मनाचे करण्याचा अधिकार आहे, असेही अजित पवार म्हणाले.
कुणीतरी खासदारकीची हवा डोक्यात भरली
“निलेश लंके पारनेरपुरता लोकप्रिय असून तिथे तो काम करू शकतो. पण बाकिच्या विधानसभा मतदारसंघातून पाठिंबा मिळवणं निलेश लंकेला जितकं सोपं वाटतं, तितकं नाही. निलेश लंकेंना पक्षात मी आणलं, त्याला आधार दिला. त्यांना विकास कामांसाठी मी नेहमीच पाठिंबा देत आलो. पण त्यांच्या डोक्यात काही लोकांनी खासदारकीची हवा घातली आहे. पण वास्तव तसे नाही. मी त्यांची समजूत घातली होती, पण शेवटी निर्णय त्यांचा आहे”, असाही इशारा अजित पवार यांनी दिला.