उपमुख्यंमत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवड शहरात असतानाच त्यांना मोठा धक्का बसला आहे. शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे नेते संजोग वाघेरे यांनी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. वाघेरे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तेव्हा खासदार संजय राऊत, ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार, ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, योगेश बाबर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, या भेटीवर आणि वाघेरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, राजकारणातले लोक नेहमीच एकमेकांच्या भेटी घेत असतात. अशी भेट काही आज झालेली नाही. हे आधीपासूनच चालत आलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी किंवा भाजपात (महायुती) इकडची उमेदवारी कोणाला देणार याची चाचपणी एखाद्याने केली असेल. एखाद्याला वाटत असेल की आपण खासदार व्हावं, याबाबतची चाचपणी त्याने केली असेल. कोणाला आमदार व्हायचं आहे, तर कोणाला खासदार व्हायचं आहे. इकडे आपल्याला तिकीट मिळणार नाही असं वाटलं असेल, त्यामुळे तिकडे गेले असतील.

कदाचित शिवसेनेत (ठाकरे गट) तिकीट मिळेल असं वाघेरे यांना वाटलं असेल. त्यामुळे उमेदवारीच्या हेतूने काहीजण तिकडे गेले असतील असं म्हणत अजित पवार यांनी सांगितलं की, अलीकडच्या काळात त्यांचं संजोग वाघेरे यांच्याशी संभाषण झालेलं नाही. ते म्हणाले, मी संजोग वाघेरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो पाहिला आहे. वाघेरे इथे (पिंपरीत) आल्यावर मी त्यांना विचारेन. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. मताचं स्वातंत्र्य आहे. महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या भागातले उमेदवार घेण्याचा त्यांचा प्रयत्न चाललाय.

हे ही वाचा >> “तुम्ही बघाच, हा अजित पवार आता…”, उपमुख्यमंत्र्यांनी अमोल कोल्हेंविरोधात दंड थोपटले, म्हणाले, “एक गोष्ट कायम…”

संजो वाघेरे हे मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी जोरदार तयारी केली होती. पण, ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी मिळवून दिली. त्यामुळे वाघेरे यांना माघार घ्यावी लागली होती. आता महायुतीत मावळची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता असल्याने वाघेरे यांनी ठाकरे गटाच्या पर्यायाची चाचपणी सुरु केल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाघेरे हे अजित पवार यांच्या गटात होते. अजित पवार आज पिंपरीत असतानाच वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने अजितदादांना धक्का बसण्याची शक्यता आहे. वाघेरे यांना ठाकरे गटाकडून मावळमधून उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar reaction on pcmc former mayor ncp leader sanjog waghere meets uddhav thackeray asc
Show comments