Ajit Pawar on Sharad Pawar Mimicry : विधानसभेची रंगत दिवसेंदिवस वाढत जात असून टीका टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपांना उत आलाय. बारामती विधानसभा मतदारसंघ यंदा हाय वोल्टेज ठरला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने काका-पुतण्यातील लढत अवघ्या राज्याला पाहायला मिळतेय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार आमने-सामने आले आहेत. युगेंद्र पवारांसाठी खुद्द शरद पवार निवडूक प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. काल (२९ ऑक्टोबर) झालेल्या सभेत शरद पवारांनी अजित पवारांनी नक्कल करून दाखवली. शरद पवारांचं हे मिश्किल रुप राज्याने पहिल्यांदाच अनुभवले. दरम्यान, अजित पवारांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

शरद पवारांनी नक्कल केल्यानंतर अजित पवार म्हणाले, “शरद पवारांनी केलेली नक्कल मी पाहिली नाही. पण माझ्या कानावर आलं. नक्कल करणं त्यांचा अधिकार आहे. मी त्यावर अधिक बोलणार नाही. पण शरद पवार महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात उंचीवर आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाप्रमाणे असलेल्या माणसाची नक्कल करणं अनेकांना आवडलं नाही. इतरांनी कोणी केली असती, तरी चाललं असतं.”

हेही वाचा >> Sharad Pawar : “साहेब डोळ्यात पाणी आणतील म्हणणाऱ्यांनी काल…”, शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल; सहा महिन्यांपूर्वीच्या टीकेचा समाचार

प्रत्येकाला भावना असतात…

अजित पवारांची २८ ऑक्टोबर रोजी बारामतीमध्ये सभा झाली. या वेळी ते भावनिक झाले होते. त्यामुळे त्या कृतीची नक्कल शरद पवारांनी करून दाखवली. या नक्कलबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “मी रुमाल काढला नव्हता. पण त्यांनी रुमाल काढला. माझ्या आई-वडिलांचं नाव घेतल्याने मी भावनिक झालो होतो. मी लगेच पाणी प्यायलो आणि विषय बदलला. प्रत्येकाला भावना असतात, मन असतं. त्यामुळे प्रत्येकवेळी माणूस कठोर असू शकत नाही. जे झालं ते नैसर्गिक पद्धतीने झालं”, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांच्या नकलेतील फरक स्पष्ट करून सांगितला.

ते पुढे म्हणाले, “आता इतके दिवस मला वाटत होतं की राज ठाकरेच नक्कल करतात की काय पण आता दुसरे समोर आले. पण मला मनाला वेदना झाल्या. कारण शरद पवारांना मी दैवत मानलं, त्यांनी माझी नक्कल करावी? आम्ही घरातली माणसं ना, लहानाचे मोठे त्यांच्यासमोर झालो. त्यांनी सांगितलं त्या सर्व गोष्टी केल्या.”