राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अलीकडेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत एक आगळंवेगळं विधान केलं. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, असं विधान सुप्रिया सुळेंनी केलं. खासदार सुळेंच्या विधानावर आता स्वत: अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. भावाच्या प्रेमापोटी सुप्रिया सुळेंनी तसं वक्तव्य केलं असेल, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
“अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यात काय चुकीचं आहे” सुप्रिया सुळेंच्या या विधानाबाबत विचारलं असता हास्य करत अजित पवार म्हणाले, “सुप्रिया सुळे माझी बहीण आहे. भावाच्या प्रेमापोटी ती मला अमिताभ बच्चन म्हणाली असेल. पण तुम्ही तेवढं मनावर घेऊ नका.”
छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत संवाद साधताना अजित पवार पुढे म्हणाले की, “पत्रकार मित्रांनो, मी जेंव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा कधी ‘अँग्री यंग मॅन’पणा दाखवला आहे का? मी माझं काम करत असतो. जे माझ्याकडून काम होईल ते करायचं आणि जे होणार नाही, ते नाही होणार म्हणून सांगायचं, ही माझ्या कामाची पद्धत आहे. माझा स्वभाव ‘अँग्री यंग मॅन’सारखा असता तर माझ्या मतदारांनी मला सात वेळा प्रचंड मताधिक्यांनी निवडून दिलं असतं का? मागच्या वेळी तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाच्या मतांनी मला निवडून दिलं. एक लाख ६८ हजारांच्या मताधिक्याने निवडून येणं, हे येड्या-गबाळ्याचं काम नाही. यासाठी बारामतीकरांना मी धन्यवाद देईन. इतर सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे आपलं कामाशी नातं असलं पाहिजे.”
हेही वाचा- राष्ट्रवादीतील आगामी बंडखोरीबाबत श्रीकांत शिंदेंचं सूचक विधान; म्हणाले, “त्यांच्या पक्षात…”
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अजित पवारांची तुलना अमिताभ बच्चनशी केली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आपल्याला अमिताभ बच्चन हा सगळ्याच चित्रपटात हवा असतो. मग त्यांचा आवाज, त्यांचा फोटो, त्यांचा लूक किंवा त्यांचा ऑटोग्राफही आपल्याला चालतो. त्याचप्रमाणे अजित पवार हे महाराष्ट्रातल्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत.”