खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत काल (२ जून) ऑन कॅमेरा थुंकले होते. त्यांच्या या कृतीचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. सर्वांनी तारतम्य बाळगलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली होती. त्यावर अजित पवारांच्या जुन्या वक्तव्याचा दाखला देत संजय राऊतांनीही त्यांच्यावर पलटवार केला होता. यासर्व प्रकरणात पुन्हा अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत ऑन कॅमेरा थुंकले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ठाकरेंना उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील असं श्रीकांत शिंदे म्हणाले. श्रीकांत शिंदे यांच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला. संजय राऊतांनी प्रश्न ऐकून घेतला आणि विचारले असं कोण म्हणालं. तेवढ्यात पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतलं. श्रीकांत शिंदेंचं नाव ऐकताच संजय राऊत ऑन कॅमेरा थुंकले. त्यांच्या या कृतीमुळे पत्रकारांनी श्रीकांत शिंदेचा प्रश्न तिथेच संपवला आणि पुढच्या विषयांवर चर्चा सुरू झाली.
हेही वाचा >> ‘या’ खासदाराचं नाव ऐकताच संजय राऊत ऑन कॅमेरा थुंकले, नेमकं काय घडलं वाचा!
अजित पवारांची प्रतिक्रिया काय?
“आपली काही संस्कृती, परंपरा आहे, इतिहास आहे. आपल्याला सगळ्यांनी यशवंतराव साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसं काम करू शकतो याबाबत दाखवून दिलं आहे, असं अजित पवार म्हणाले. तसंच, संजय राऊतांची दुसरी बाजू ऐकायला मिळाली की त्यांना कसालतरीही त्रास होतोय. परंतु, प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोलावं”, असं अजित पवार काल (२ जून) म्हणाले होते.
धरणांत मुतण्यापेक्षा….- संजय राऊत
प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोलावं असं अजित पवारांनी म्हटल्यानंतर पत्रकारांनी याबाबत संजय राऊतांना विचारले. “धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं”, असं जोरदार प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं. तसंच “ज्याचं जळतं त्याला कळतं”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. “आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभा आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपासारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >> “धरणांमध्ये मुतण्यापेक्षा…”, संजय राऊतांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “आम्ही सगळं भोगूनही…”
ती मोठी माणसं – अजित पवार
संजय राऊतांनी अजित पवारांवर पलटवार केल्यानंतर अजित पवारांनी सयंमी प्रतिक्रिया दिली आहे. “ते काही बोलल्याने आम्हाला काही भोकं पडत नाहीत. ती मोठी माणसं आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे”, असं अजित पवार म्हणाले.