कोल्हापूर : उद्धव ठाकरे यांच्यावर आपण केलेली टीका ही ग्रामीण भाषेत असल्यानेच त्यामध्ये ‘बाप’ असा शब्द वापरला आहे. पण आपण सत्य तेच बोललो असून आपल्या विधानावर ठाम असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ‘जे बापाचे स्मारक करू शकत नाहीत ते अयोध्येला जाऊ न काय करणार’ अशी एकेरीतील टीका केली होती. त्याचे पडसाद आज सर्वत्र उमटले.

आपल्या या विधानावरून होत असलेल्या टीकेबाबत विचारणा केली असता पवार यांनी आपण आपल्या विधानाशी आजही ठाम आहोत असे सांगितले. ते म्हणाले, की बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक गेली पाच वर्षे रेंगाळले असल्यानेच आपण त्यांच्यावर ही टीका केली. ही करताना वापरलेला ‘बाप’ हा शब्दप्रयोग ग्रामीण ढंगातून आहे. जन्मदात्यास ग्रामीण भागात ‘बाप’ असे म्हटले जाते.  त्याचा संदर्भ घेतच मी ‘जे बापाचे स्मारक करू शकत नाहीत ते अयोध्येला जाऊ न काय करणार’ असा प्रश्न केला होता. पण सत्य बोचल्याने त्यांना मिरच्या झोंबल्या आहेत.

आघाडीत समान जागा हव्यात

काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी समविचारी पक्षांना सोबत घेऊ न निवडणूक लढवायची ठरवले आहे. उभय काँग्रेसला समान जागा मिळाल्या पाहिजेत, अशी राष्ट्रवादीची  मागणी आहे. दोन्ही काँग्रेसला २४ — २४ अशा सामान जागा दिल्या जातील. याबाबत पुढील आठवडय़ात मुंबईत  बोलणी  होणार आहे. किमान ५ महिने आधी उमेदवार निश्चित  व्हावा आणि तो प्रचाराला लागावा, असे नियोजन असल्याचे पवार यांनी सांगितले . गतवेळी हातकणंगलेची जागा काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासाठी आम्ही सोडली होती. आता ती आमच्याकडे असेल, असेही ते म्हणाले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar reaction on uddhav thackeray remark