Ajit Pawar on Devendra Fadnavis & Batenge to Katenge by Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या एका घोषणेमुळे मोठा राजकीय वादंग उठला आहे. त्या घोषणेमुळे प्रामुख्याने महायुतीत दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देत जनतेला सावधानतेचा इशारा दिला होता. त्यानंतर विरोधकांनी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजपा नेत्यांनी व शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांनी देखील योगींची ही घोषणा उचलून धरली आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने मात्र या घोषणेचा विरोध केला आहे. अजित पवारांनी स्पष्ट केलं की आम्ही या घोषणेशी सहमत नाही. दरम्यान, अजित पवारांच्या विरोधानंतर देवेद्र फडणवीस यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया देत अजित पवारांच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अजित पवार हे गेल्या अनेक दशकांपासून स्वतःला सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) म्हणवून घेणाऱ्या लोकांबरोबर राहिले आहेत. त्या लोकांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष असल्याचं ते सांगत आले आहेत. परंतु, त्यांचं धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे हिंदूविरोधी असण्यासारखं आहे. हिंदुत्वाचा विरोध म्हणजेच धर्मनिरपेक्षता अशी विचारधारा असलेल्या लोकांबरोबर अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून राहिले आहेत. त्यामुळे जनतेचा मिजाज (कल), राष्ट्रवादी मिजाज समजून घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागेल”.
हे ही वाचा >> अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”
देवेंद्र फडणवीसांचा चिमटा, अजित पवारांचं प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीसांनी चिमटा काढल्यानंतर त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, “आम्ही सर्वांनीच त्या वक्तव्याचा विरोध केला आहे. मी एकट्यानेच विरोध केलेला नाही. मला आत्ताच माहिती मिळाली की भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील त्या घोषणेचा विरोध केला आहे. एका राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येतात आणि ‘बटेंगे तो कटेंगे’सारख्या घोषणा देतात, हे ठीक नाही. अशा घोषणा द्यायला हा काही उत्तर प्रदेश नाही. तिकडे उत्तरेकडे असल्या घोषणा चालत असतील. परंतु, हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालतो. मी राजकारणात आल्यापासून ही गोष्ट पाहत आलोय. त्याआधी विद्यार्थीदशेत असताना देखील मी पाहत आलोय की आपला महाराष्ट्र शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालतो. त्याशिवाय दुसऱ्या कोणाचेही विचार इथे चालत नाहीत”. अजित पवार एएनआयशी बोलत होते.
हे ही वाचा >> Ramdas Kadam : “बापाला विचार, राणे व राज शिवसेनेतून गेल्यावर मातोश्रीबाहेर…”, रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ पसंत नाही; अजित पवार भूमिकेवर ठाम
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “आम्ही नेते मंडळी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांना, पत्रकारांना मुलाखती देतो, प्रत्येकाची प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असते. त्यावर दिलेली उत्तरे वेगवेगळी असतात. बऱ्याचदा त्याचे वेगळे अर्थ काढले जातात. देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं ते मला माहिती नाही. परंतु, मी तुम्हाला सांगतो, आम्हाला हे ‘बटेंगे तो कटेंगे’ वगैरे पसंत नाही. महाराष्ट्रात हे चालणार नाही.