Ajit Pawar on Kunal Kamra Remark : लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर (शिंदे) विडंबनात्मक कविता सादर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. त्या कवितेमुळे कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, शिंदेंच्या शिवसैनिकांनी मुंबईतील खार भागात असलेल्या युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओची तोडफोड केली आहे. याच स्टुडिओमध्ये कुणाल कामराचा कॉमेडी शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्याने त्याची कविता सादर केली होती.

याप्रकरणी शिवसेनेकडून (शिंदे गट) एमआयडीसी पोलिसांत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर भाष्य केलं आहे.

अजित पवार म्हणाले, “कोणीही कायदा व संविधानाच्या नियमाबाहेर जाऊन वागू नये, बोलू नये. आपल्या संविधानाने तुम्हाला, मला आणि सर्वांनाच जे अधिकार दिले आहेत त्या अधिकारांचा वापर करून आपण मतं व्यक्त करू शकतो. आपली वैचारिक भूमिका वेगळी असू शकते, आपल्या विचारधारा वेगवेगळ्या असू शकतात, आपल्यात मतमतांतरे असू शकतात, परंतु आपली मतं मांडताना, त्यावर चर्चा करताना त्यातून नवे प्रश्न निर्माण होऊ नयेत. आमच्या पोलिसांना वेगळं काम लगू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्व जबाबदार नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे.

राम कदम म्हणाले, “टायमिंग बघा…”

दरम्यान, भाजपा आमदार राम कदम यांनी देखील यावर टिप्पणी केली आहे. कदम म्हणाले, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाल कामरा काहीही बोलणार का? महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तो जे काही बोलला ते वक्तव्य महाराष्ट्राच्या भूमीचा अवमान आहे. कुणाल कामरा हा ठाकरे गटाची सुपारी वाजवतोय का? तुम्ही त्याने केलेल्या वक्तव्याचं टायमिंग बघा. दिशा सालियन खून प्रकरणात ठाकरे कुटुंबाचं नाव पुढे आल्यानंतर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी कुणाल कामरा याने ही वेळ निवडली आहे का?”

आदित्य ठाकरेंचा सरकारवर संताप

दरम्यान, शिवसेना (शिंदे) कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीनंतर आदित्य ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “विनोदी कलाकार कुणाल कामराने जिथे एकनाथ मिंधेंवर गाणं सादर केलं तो कॉमेडी शोचा मंच मिंधेंच्या भ्याड टोळीने तोडला. जे गाणं १००% खरे होते. एखाद्याच्या गाण्यावर फक्त एक असुरक्षित भ्याडच प्रतिक्रिया देईल.”