महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळा प्रकरणी पुन्हा अंमलबजावणी संचालनालयाद्वारे (ईडी) चौकशी सुरु केली जाणार असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली आहे. पुन्हा चौकशी सुरु झाल्यास अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला होता. आता महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची मागणी होत आहे. माध्यमांतील काही वृत्तांनुसार या प्रकरणाची चौकशीही ईडीकडून केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अजित पवारांसहीत अन्य ७६ संचालकांची पुन्हा ईडीकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. याचसंदर्भात अकोला येथे पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
नक्की वाचा >> विश्लेषण: २५ हजार कोटींचा ‘शिखर बँक घोटाळा’ नेमका आहे तरी काय? अजित पवारांसहीत FIR मध्ये ३०० मंत्री, अधिकाऱ्यांची नावं
अजित पवार आणि अन्य ७६ जणांविरोधीत पुढील कारवाई करण्यासाठी ठोस पुरावे आढळले नसल्याचे आर्थिक गुन्हे विभागातर्फे ( ईओडब्ल्यू ) सांगितले होते. तसा, अहवाल ईओडब्ल्यूकडून न्यायालयात सादर करण्यात आला होता. पण, मूळ तक्रारदाराने केलेली निषेध याचिका आणि ईडी अहवालाच्या आधारे प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आल्याचे ईओडब्ल्यूने म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये पुन्हा तपास सुरु होत असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच अजित पवार यांनी यासंदर्भात भाष्य करताना राजकीय संदर्भ दिला आहे.
अजित पवार यांनी ईडीकडून शिखर बँक घोटाळ्याची चौकशी होण्याची शक्यता असल्याच्या प्रश्नावर अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. “तो त्यांचा अधिकार आहे. शेवटी काय जो कोणी राज्यकर्ता असतो तो निर्णय घेतो अशापद्धतीचं राजकारण सुरु आहे,” असं अजित पवार म्हणाले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांनी म्हटलं म्हणून घड्याळ बंद पडणार का? मशाल विजणार का?” असं उपरोधिक सवाल अजित पवार यांनी केला. “महागाई, बेरोजगारी असे जे काही प्रश्न आहेत ते विचारा,” असा सल्ला त्यांनी पत्रकारांना दिला. तसेच, “मी अकोल्यात आलोय. इथं जी भरपाई मिळायला हवी होती. त्यासंदर्भातील मदतही मिळालेली नाही. आजही पाऊस सुरु आहे. त्यांच्यासंदर्भात काही सांगितलं तर पंचनामे सुरु आहेत, चेक सोडलेत. वास्तविक तसे चेक शेतकऱ्यांना मिळत नाहीत. शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. नाउमेद होऊ न देता त्यांना वेळीच मदत करा,” असं आवाहन अजित पवार यांनी शिंदे सरकारला केलं.