महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रामुख्याने संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीचा मुद्दा उपस्थित करत ‘ईडी’च्या कारवाया अन्यायकारक असल्याचं शरद पवार यांनी मोदींना सांगितलं. शरद पवारांनी यावेळी नवाब मलिकांचा मुद्दा उपस्थित केला नसल्याचंही सांगितलं. दरम्यान संजय राऊतांच्या अटकेनंतर इतक्या घाईने पंतप्रधानांसमोर मुद्दा उपस्थित करणाऱ्या शरद पवारांना नवाब मलिकांपेक्षा ते जास्त महत्वाचे वाटतात का? अशी विचारणा एमआयएमने केली आहे. एमआयएमच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलंय.
पवार नेमकं काय म्हणाले?
राज्यातील मंत्री नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्याविरोधातही ‘ईडी’ आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. या नेत्यांवरील कारवाईबद्दल विचारले असता, त्यांच्याबद्दल मोदींशी चर्चा केली नाही, असं पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. पण, केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करणार असतील तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारला घ्यावी लागेल, असंही पवार म्हणाले.
नक्की वाचा >> सोमय्यांना ‘येड**’, ‘चु**’ म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या शिवराळ भाषेबद्दल रोहित पवारांचं रोकठोक मत; म्हणाले, “शब्द..”
एमआयएमने काय म्हटलंय?
एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शरद पवारांनी संजय राऊतांचा मुद्दा पंतप्रधानांसोबत चर्चेस नेल्याने भुवया उंचावल्या आहेत. “शरद पवारांनी इतकी घाई त्यांच्या पक्षाचे नवाब मलिक अटक झाल्यानंतर का दाखवली नाही?”, अशी विचारणा त्यांनी केली आहे. “फक्त संजय राऊतांबद्दल चर्चा? का? तुमच्या पक्षाचेच मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली तेव्हा तुम्हाला इतक्या गडबडीत मोदींशी चर्चा करावीशी वाटली नाही? की संजय राऊत नवाब मलिकांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. तुमच्याकडे तुमचे स्वतःचे असे वेगळेच खेळ आहेत शरद पवार.” असं इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. तसेच “तुमचे मंत्री नवाब मलिक यांना अटक होऊन ते तुरुंगात असताना तुम्ही पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखवली नाही?”, असंही ते म्हणालेत.
अजित पवारांचं उत्तर…
इम्तियाज जलील यांनी केलेल्या टिकेसंदर्भात पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं. शरद पवारांनी संजय राऊत यांच्यासाठी पंतप्रधानांशी भेट घेतली मात्र नवाब मलिक व अनिल देशमुख यांचा त्यांना विसर पडला का असा प्रश्न जलील यांच्या टीकेचा संदर्भ देत अजित पवारांना विचारण्यात आला. अजित पवार यांनी, “काहीजण अशा प्रकारच्या बातम्या जाणीवपूर्वक पद्धतीने पसरवून विपर्यास करून समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे उत्तर या प्रश्नावर बोलताना दिलं.