उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात शाब्दिक चकमक रंगली आहे. “अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं वय विचारण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय विचारावे,” अशी टीका नाना पटोलेंनी केली होती. याला अजित पवारांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत महिला निर्धार मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

नाना पटोले काय म्हणाले?

“अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची भाजपानं मांजरीसारखी अवस्था करून ठेवली आहे. अजित पवारांनी शरद पवार यांचं वय विचारण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय विचारलं पाहिजे. मग अजित पवारांची हिंमत दिसेल,” असं आव्हान नाना पटोलेंनी दिलं होतं.

“जेव्हा मोदींचं वय होईल, तेव्हा विचारू”

याबद्दल प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं अजित पवारांना प्रश्न विचारला. “आपल्या सगळ्यांचं वय होणार आहे. जेव्हा मोदींचं वय होईल, तेव्हा विचारू. आमचं आम्ही बघू… बाकीच्यांनी नाक खुपसण्याचं कारण नाही. नाना तू किती पक्ष फिरून आला आम्हाला माहिती आहे,” असा एकेरी उल्लेख करत अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“व्हिडीओ व्हायरल करणारे इतके मूर्ख लोक आहेत की…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांचा कारमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला. याबद्दल प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, “व्हिडीओ व्हायरल करणारे इतके मूर्ख लोक आहेत की आता काय बोलू. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौऱ्यामध्ये प्रत्येक कारमध्ये कुणी बसायचं ठरलेलं असतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार चालवत होते. पाठीमागे मी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे होतो.”

हेही वाचा : “पंतप्रधान मोदींचंही वय झालं, अजित पवार त्यांना…”; वयोमानावरुन नाना पटोले यांची खोचक टीका

“आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही”

“आमचे सहकारी गिरीश महाजन यांना चेहऱ्याला जखम झाली. त्यांना तिथे कार राहिली नाही. सगळा ताफा निघून गेला. मी त्यांना म्हटलं आपण एकत्र कारमध्ये जाऊ. आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही. आम्ही सगळ्यांना सामावून घेणारी माणसं आहोत. त्यामुळे मला त्या गोष्टीला काही महत्त्व द्यावं वाटत नाही. जागा असताना आम्ही कुणाला नाही म्हटलं नाही. इतर कारच्या ताफ्यापर्यंत येईपर्यंत आम्ही गेलो. जे व्हिडीओ व्हायरल करत आहेत त्यांची मला कीव करावीशी वाटते. आपण विकासाबाबत बोलू की, कारमध्ये कोण कसं गेलं ते कारमध्ये बसणारे पाहून घेतील,” असं अजित पवारांनी सांगितलं.