Ajit Pawar vs Raj Thackeray : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरुवात केली आहे. या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय नेते आपआपल्या पक्षसंघटनेचा आढावा घेत आहेत, पक्षांची पुनर्बांधणी करत आहेत, मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी करू लागले आहेत. तसेच नेत्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुंबईत पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
दरम्यान, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले, “एक खोक्याभाई काय घेऊन बसलात? अख्खी विधानसभा खोक्यांनी भरलेली आहे”. बीडमधील गुंड खोक्या उर्फ सतीश भोसले याचा एक व्हिडीओ अलीकडेच व्हायरल झाला होता. यामध्ये तो एका इसमाला बेदम मारहाण करत होता. त्यानंतर त्याचे आणखी काही व्हिडीओ व्हायरल झाले. ज्यामुळे त्याच्याकडे लाखो रुपयांची नोटांची बडलं दिसत होती. या संदर्भाने राज ठाकरे म्हणाले, “विधानसभेत सगळेच खोके भरले आहेत.” हा खोक्या भोसले भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे.

अजित पवारांचा राज ठाकरेंना प्रतिप्रश्न

दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यावर उपमुख्यममंत्री अजित पवार यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी काही वेळापूर्वी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार यांनी राज ठाकरे यांना प्रतिप्रश्न केला की “तुम्ही कधी निवडून आलाय का?”

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

“मला हे कळलं नाही, एक खोक्याभाई काय घेऊन बसलात? अख्खी विधानसभा खोक्यांनी भरलीय. विधानसभेत सगळे खोकेभाईच भरलेत. त्यांच्यामुळे मुख्य विषय बाजूला राहतात आणि आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीत तुम्हाला भरकटवून टाकलं जात आहे”.

राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा संदर्भ काय?

भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याचे पैसे उडवतानाचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. दरम्यान, याचाच संदर्भ देत राज ठाकरे यांनी रविवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महायुती सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली होती.