एक महिन्यापूर्वी अजित पवारांसह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली होती. ९ जणांनी केलेल्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली आहे. पण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दाव्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मिलीभगत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. याला आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
राज ठाकरे काय म्हणाले?
“अजित पवारांचा शपथविधी झाला त्यादिवशी मी पहिल्या एका तासात एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटमध्ये मी पहिली टीम रवाना झाली, असं म्हटलं होतं. सगळं तसेच होत आहे. शरद पवारांचं राजकारण मी खूप वर्षांपासून पाहतो आहे. त्यांचं हे असंच आहे. अजित पवार आणि शरद पवारांची मिलीभगत आहे,” अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.
हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार समोरसमोर आले आणि…, ‘या’ क्षणाची चर्चा
याबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना विचारल्यावर ते संतापले. “त्यांचं काय मत असेल, ते त्यांना लखलाभ. कोण कोणाला वेड आणि कोण कोणाला शहाणे बनवतंय, याचा मक्ता त्यांना कोणी दिला? स्वत:चे काय चालले आहे, ते सांभाळावे,” अशा शब्दांत अजित पवार यांनी राज ठाकरे यांना खडसावलं आहे.
हेही वाचा : “लोकमान्य टिळकांनी केलेल्या शिफारसीनंतर वीर सावरकर…”, पंतप्रधान मोदींनी सांगितला किस्सा
संभाजी भिडे यांच्यावर अद्यापही कारवाई झाली नाही? असे विचारल्यावर अजित पवार म्हणाले, “त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राज्यात महापुरुषांबद्दल कोणीही वाचळविरांनी बेताल वक्तव्य घेतलेलं, कोणतेही सरकार खपवून घेणार नाही.”