राज्यातील सहकार चळवळीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेत्यांचा समाचार घेतला आहे. “सहकार चळवळ संभाळण्याची क्षमता महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये आहे. यापुढेही सक्षमपणे चालवली जाईल. पण, आताची सहकार चळवळ सहारा चळवळ झाली आहे,” अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत राज ठाकरेंना सवाल विचारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“सहकार चळवळ संभाळण्याची क्षमता महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये आहे. यापुढेही सक्षमपणे चालवली जाईल. पण, आताची सहकार चळवळ सहारा चळवळ झाली आहे. मुंबईतील महानंदा दूध संघ गुजरामधील अमोल दूध संघ गिळंकृत करेल. राज्यातील सहकारी संस्थांवर गुजरातचा डोळा आहे. कारण, राज्यातील नेते मिंधे झाले असून, त्यांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवला आहे. राज्य सरकारही लाचार झाले आहे. मराठी माणूस चांगला व्यवसाय करू शकतो. मात्र, मराठी माणसांत फूट पाडली जात आहे. सध्या आपण जाती जातीत भांडत बसलोय,” अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.

हेही वाचा : “…तर अजित पवारांबरोबर गेलो असतो”, रोहित पवारांचं मोठं विधान

“मी सहकारातून आलेला एक कार्यकर्ता आहे”

दरम्यान, ‘आताची सहकार चळवळ सहारा चळवळ झाली आहे’, राज ठाकरेंच्या या विधानाबाबत पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, “राज ठाकरेंनी किती सहकारी संस्था उभ्या केल्या आहेत? मी सहकारातून आलेला एक कार्यकर्ता आहे. मी पुणे जिल्हा बँकेचं ३२ वर्षे प्रतिनिधीत्व केलं आहे. ती राज्यात अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते.”

हेही वाचा : “राजकीय नेते लाचार, मिंधे, पैशांसाठी…”, राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी; महात्मा फुलेंचे उदाहरण देत म्हणाले…

“…तर सगळ्यांना एका माळेत मोजू नये”

“माझ्या विचारांनी चालणाऱ्या संस्था चांगल्या चालल्या आहेत. कारण, संस्थांबाबत माझी भूमिका अतिशय कडक असते. उलट, महाराष्ट्र सहकारी बँकेत १० हजार आणि २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचं सांगून आम्हाला लक्ष्य करण्यात आलं. पण, महाराष्ट्र सहकारी बँकेचा नफा ६०० कोटींहून अधिक आहे. एखाद्या बँकेत गडगड झाली, तर ती रसातळाला जाते. महाराष्ट्रातील अनेक जिल्हा बँका अडचणीत आहेत. राज ठाकरेंनी आपली व्यक्तिगत भूमिका मांडली आहे. काही जणांकडून चुका होत असतील, तर सगळ्यांना एका माळेत मोजू नये,” असा सल्लाही अजित पवारांनी राज ठाकरेंना दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar reply raj thackeray over cooperative movement sahara movement statement ssa