महाराष्ट्रात अस्वस्थेमुळे माय-बाप जनतेचं नुकसान होत आहे. २०० आमदारांचं सरकार असूनही स्थिर नाही, असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. २०० आमदारांचा पाठिंबा असणारे सरकार स्थिर नाही, असं कसं म्हणू शकतो? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“महाराष्ट्रातील अस्वस्थेमुळे माय-बाप जनतेचं नुकसान होत आहे. २०० आमदारांचं सरकार आहे. पण, स्थिरपणा देत नाही. याने राज्याच्या विकासाचं नुकसान होत आहे. दिल्लीतून पाहते, तेव्हा महाराष्ट्राचा विकास दीड वर्षात थांबल्याचं दिसते. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. हा राजकीय नाहीतर सामाजिक विषय होऊ शकतो,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

हेही वाचा :

याबद्दल पुण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “२०० आमदारांचा पाठिंबा असणारे सरकार स्थिर नाही, असं कसं म्हणू शकतो?”

हेही वाचा :

आमदारांच्या सुनावणी वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत, याबाबत प्रतिनिधींनी प्रश्न केल्यावर अजित पवारांनी म्हटलं, “प्रत्येकाचं वेगवेगळं काम सुरू आहे. सरकार आपलं काम करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासाला महत्व देतात. पण, प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुणी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाकडे गेलं आहे. ही एक वेगळी प्रक्रिया आहे.”

“एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महायुतीचं काम चालू आहे. आम्ही लवकरच राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहोत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळही मागून घेतली आहे. या बैठकीला मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहोत,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar reply supriya sule statement maharashtra govt not still ssa