भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रविवारी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पडळकर यांनी एका व्हिडीओतून माझ्यावर हल्ला करण्यामध्ये जयंत पाटील यांचा सहभाग होता असा आरोप केला. गोपीचंद पडळकर यांनी तो व्हिडीओ ७ नोव्हेंबर रोजीचा असल्याचा दावा केला होता. यामध्ये आटपाडी पोलीस स्टेशनच्या जवळून जात असताना माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. हा हल्ला सुनियोजित होता, माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूने २०० ते ३०० लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता असा आरोप पडळकर यांनी केला आहे. याच मुद्द्यावरुन विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचा मुद्दावरुन देवेंद्र फडणवीस हे चांगलेच आक्रमक झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून गोपीचंद पडळकरांच्या हत्येचा कट केला असल्याचा खळबळजनक आरोप फडणवीस यांनी केला.
“माझ्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटात जयंत पाटील आणि पोलीस अधिक्षकांचा सहभाग”; गोपीचंद पडळकरांचा आरोप
गोपीचंद पडळकर यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा व्हिडिओ काल व्हायरल झाला आहे. घटनास्थळाजवळ एक डंपर आणण्यात आला होता. तो डंपर पडळकर यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न होता. त्या डंपर मध्ये दगड आणि काठ्या होत्या. त्याशिवाय त्यामध्ये सोडा बॉटल होत्या असे फडणवीस यांनी स्टेशन डायरीचा हवाला देत म्हटले. ही सगळी घटना पोलीस स्टेशनसमोर झाली. त्याठिकाणी २००-३०० लोकं होते. त्या ठिकाणी असलेले पोलीस घटनेचे चित्रीकरण होते, असा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला. पडळकरांवर हल्ला करणाऱ्यांचा राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांसोबत फोटो असल्याचाही दावा फडणवीस यांनी केला होता. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले.
“नितेश राणेंना कायमचे निलंबित करा”; आदित्य ठाकरेंसंदर्भातील वक्तव्यानंतर भास्कर जाधव आक्रमक
“या राज्याला सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते त्यामुळे प्रत्येक माणसाला संरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. राज्यकर्ते कुणीही असले तरी त्यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. राज्यातल्या जनतेने एका गोष्टीचे भान ठेवले पाहिजे. सगळा महाराष्ट्र मला ३० वर्षे ओळखतो. अजित पवारांवर जबाबदारी दिली तर चार दिवसांत राज्य विकून खाईल असे काही जण म्हणतात. ही काय पद्धत झाली. मी कुणाच्या मध्ये नसतो फक्त विकास कामांबद्दल मी बोलतो. कुठल्याही राजकीय पक्षाची व्यक्ती कामासाठी माझ्याकडे आली तर त्यामध्ये मी मनापासून लक्ष घालतो. दोन्ही बाजूच्या लोकांनी आपल्याला विधानपरिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये लोकांचे प्रतिनिधी म्हणून पाठवलं जातं त्यावेळेस थोडे तारतम्य ठेवून वागलं पाहिजे,” असे अजित पवार यांनी म्हटले.
“वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होतातच. देवेंद्र फडणवीसांनी गोपीनाथ मुंडेंचे उदाहरण दिले पण शरद पवारांच्या कामाची पद्धत महाराष्ट्राला माहिती आहे. मी यासंदर्भात राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत बोलत होतो. काही सदस्य संरक्षण दिल्यानंतर ते नको अशी भूमिका मांडतात. पण सरकार म्हणून आम्ही त्यामध्ये लक्ष घालू. याप्रकरणात जे कोणी दोषी असतील त्याची शाहनिशा करुन योग्य ती कारवाई केली जाईल,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले.