शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मोठा बंड करुन राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आणला आहे. शिवसेनेचे ३५ पेक्षा अधिक आमदार एकनाथ शिंदे यांनी फोडले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतर एकनाथ शिंदे यांनी घटक पक्षांवर थेट आरोप करत शिवसैनिक भरडला गेला असल्याचे म्हटले आहे. तसेच शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनीही पत्रातून निधी वाटपाबाबत तक्रार केली होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी पहिल्यांदाच राज्यातील राजकीय परिस्थिवर भाष्य केले आहे.
“आमच्यातील काही मित्रपक्ष थोडे वेगळ्या प्रकारचे वक्तव्य करत आहेत. अजित पवारांनी निधीचा वापर केल्याचे बोलले जात आहे. मला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगायाचे आहे की, सरकार अडीच वर्षापूर्वी अस्तित्वात आले त्यावेळी ३६ पालकमंत्री हे एक तृतीयांश काँग्रेस एक तृतीयांश शिवसेना आणि एक तृतीयांश राष्ट्रवादीचे नेमले. त्यांना निधी देताना कुठेही काटछाट केली नाही. अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला निधी देण्यात आला आहे. पण त्यांनी तशा पद्धतीने वक्तव्य का केले मला माहिती नाही. मी कधीही दुजाभाव केला नाही. सगळ्यांना विकासकामांमध्ये मदत करण्याची भूमिका माझी असते हे आपण पण पाहिले आहे. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचे काम मी करत असतो. माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा सर्व मंत्री समोर असताना सांगितले असते तर तिथल्या तिथे गैरसमज दूर झाले असते. अशा काळामध्ये तिघांनी पण आघाडी कशी टिकेल आणि ही परिस्थिती कशी हाताळता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाइव्हद्वारे भूमिका मांडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली होती. गेल्या अडीच वर्षात घडलेल्या चार मुद्द्यांच्या आधारे त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. “गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला. यामध्ये शिवसैनिक भरडला गेला. एकीकडे घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत गेलं,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.
बंड करणारी प्रमुख व्यक्ती टिकते, पण नंतर…
“शिवसेनेत जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं बंड झालं त्यावेळी नेते एका बाजूला गेले, शिवसैनिक त्यांच्या मागे गेले नाहीत. मी राजकारणात आल्यानंतर हे शिवसेनेतील तिसरं बंड आहे. मी छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांचं बंड पाहिलं. हे सर्व पाहिलं तर बंड करणारी प्रमुख व्यक्ती टिकते, पण नंतर इतर सहकारी निवडूनही येऊ शकत नाहीत इतकं शिवसैनिक कष्ट घेतात. शिवसैनिक त्यांचा पराभव करण्यासाठी जीवाचं रान करतात असा मागील अनुभव आहे,” असेही अजित पवारांनी म्हटले.
दरम्यान, यावेळी अजित पवारांसमोर राज ठाकरेंच्या बंडाचा उल्लेख केला असता ते त्यांच्या घरातील प्रकरण होतं असं ते म्हणाले. दरम्यान यावेळी अजित पवारांना हा शिवसेनेचा महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा डाव आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी अडीच वर्ष उद्धव ठाकरेंसोबत जे काम केलं आहे, ते पाहता त्यांचा स्वभाव नाही. ते मोकळेपणाने मला असं करायचं आहे सांगतात”.
बाळासाहेबांच्या पुत्राला संकटसमयी सोडून कसे जाणार? शिवसेना खासदाराचा भावनिक सवाल
दरम्यान,शिवसेना आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक महाविकास आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असून, महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे, असे आवाहन बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांना केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे दिलेला मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव शिंदे यांनी फेटाळला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे बोलताना बंडखोर आमदारांना समोरासमोर येऊन बोलण्याचे आवाहन केले होते. तसेच शिंदे यांना अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव देऊन बघावा, अशी चर्चा झाली होती.