“काहीही करून कांदा निर्यात बंदी करू नका”, अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. “या कांद्याने आम्हाला रडवलंय” असंही अजित पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, अजित पवार यांनी सांगितलं, “आपण दुधासाठी पाच रुपयाचं अनुदान देत आहोत, काल राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. त्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दूध पावडरची निर्यात करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.” यासह राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अजित पवार यांनी यावेळी माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी (६ जुलै) संध्याकाळी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शासकीय योजना आणि अंमलबजावणी संदर्भात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार बोलत होते. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मंत्री पंकजा मुंडे व आमदार आशिष शेलार उपस्थित होते.

हे ही वाचा >> “मंत्री मला म्हणतात, काहीही बोला पण…”, मनोज जरांगेंनी सांगितली राज्य सरकारची भिती

महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, इथे पीयूष गोयल उपस्थित आहेत. मला त्यांना एक विनंती करायची आहे. काहीही करून कांदा निर्यात बंदी करू नका. त्या कांद्याने अनेकांना अक्षरशः रडवलं आहे. त्या कांद्यामुळे आपल्या नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये कित्येक अडचणी निर्माण झाल्या. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याचा अनेक गोष्टींवर गंभीर परिणाम झाला. आपल्यालाही त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागली. आता दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दूध पावडरच्या निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जेणेकरून दुधाच्या पावडरची निर्यात करता येईल. राज्यातील दुधाचा साठा, दुधाच्या पावडरचा साठा बाहेर जाईल. त्यातून दुधाला चांगला दर मिळेल. त्यामुळे माझी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि प्रतापराव जाधव या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की तुम्ही दुधाची पावडर आयात करू नका आणि कांद्याची निर्यात बंद करू नका.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar request to piyush goyal do not ban onion export asc