राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसह इतर पक्षातून भाजपात जाऊन महत्त्वाची पदं घेणाऱ्या नेत्यांचा मुद्दा उपस्थित करत भाजपाच्या जुन्या नेत्यांना जोरदार टोले लगावले. तसेच सुधीर मुनगंटीवर, आशिष शेलार, गिरीश महाजन या भाजपाच्या जुन्या नेत्यांना जे जमलं नाही ते राहुल नार्वेकरांनी ३ वर्षात करून दाखवल्याचं म्हणत अजित पवारांनी भाजपा नेत्यावर निशाणा साधला. ते रविवारी (३ जुलै) विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या स्वागतपर भाषणात बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “भाजपातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांसाठी देखील एक आश्चर्यकारक बाब आहे. बरेच नेते अनेक वर्षे काम करत आहेत. सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन यांना जे जमलं नाही ते राहुल नार्वेकर यांनी ३ वर्षात करून दाखवलं. हा कौतुकाचा भाग आहे.”
“मी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव सुचवलं होतं”
“मी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव सुचवलं होतं. म्हटलं काय बडबड करायची ती तिथं बसून करावी. किती तास, किती मिनिटं, किती सेकंद, किती वर्ष सगळं सागू द्यावं,” असं म्हणत अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवारांना टोला लगावला. तसेच यानंतर मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या असंही म्हटलं.
“आमच्या मान्यवरांना पदावर पाहून मूळ भाजपाच्या मान्यवरांविषयी वाईट वाटतं”
अजित पवार पुढे म्हणाले, “मी जेव्हा सभागृहात समोरच्या बाजूला पाहतो तेव्हा मूळचे भाजपाचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्त मान्यवर पाहायला मिळतात. आमच्या मान्यवरांना पदावर बसलेलं पाहून मला मूळ भाजपाच्या मान्यवरांविषयी वाईट वाटतं. ते मूळ मान्यवरांना बाजूला सारून तिथं पदावर बसलेत. पहिली रांग पाहिली तरी ते लक्षात येईल. गणेश नाईक, बबन पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत हे आमच्याकडून गेलेले मान्यवर पहिल्या ओळीत आहेत.”
“…आणि कितीतरी भाजपाचे नेते तर धडाधडा रडायलाच लागले”
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे बसलेले दीपक केसरकर तर काय चांगले प्रवक्ते झाले आहेत. म्हणजे त्यावेळी आम्ही शिकवलेलं कुठं वाया गेलं नाही. अनेक कट्टर काम करणारे मान्यवर थोडेसे नाराज आहेत. देवेंद्र फडणवीस टीव्हीवर बोलत होते आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील सांगितलं तेव्हा ‘पिन ड्रॉप सायलन्स’ झाला. कितीतरी भाजपाचे नेते तर धडाधडा रडायलाच लागले. कुणाला काही कळेनाच. सगळ्या महाराष्ट्रासाठीच तो धक्का होता,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.