राष्ट्रवादीचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील बंडखोरीवरून कोपरखळी लगावली. एकनाथ शिंदे यांनी पुढील अडीच वर्षे मला मुख्यमंत्री व्हायचं आहे असं माझ्या कानात सांगितलं असतं, तर मीच उद्धव ठाकरेंना सांगून तुम्हाला या पदावर बसवलं असतं,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसेच आदित्य ठाकरेंचं नाव खेत काही अडचण आली नसती ना असं म्हणत त्यांनाही टोला लगावला. यावर सभागृहात एकाच हशा पिकला. ते रविवारी (३ जुलै) विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या स्वागतपर भाषणात बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम केलं आहे. बंडखोरी कशामुळे घडली, नेमकं काय घडलं याची माहिती नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी माझ्या कानात सांगितलं असतं की, ‘अजित, उद्धव ठाकरेंना सांग, अडीच वर्षे झालेत, आता अडीच वर्षे मला मुख्यमंत्रीपद द्या’ तर मीच उद्धव ठाकरेंना सांगितलं असतं आणि आम्हीच तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर बसवलं असतं. काहीच अडचण आली नसती,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी आदित्य काही अडचण आली नसती ना? असं म्हणत आदित्य ठाकरेंनाही कोपरखळी लगावली.
मुनगंटीवारांची अजित पवार, आदित्य ठाकरेंवर टोलेबाजी
अजित पवारांच्या टोलेबाजीला भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रत्युत्तर दिलं. “एकनाथ शिंदेंनी अजितदादांच्या कानात नाही सांगितलं ती त्यांची चूक होती. पण तुम्हाला भविष्यात मुख्यमंत्री बनावं, असं कधी वाटलं तर आमच्या कानात मात्र नक्की सांगा. जयंत पाटलांच्या कानात कधीच सांगू नका, तिथे सांगाल तर धोका आहे. इच्छा होईल तेव्हा फक्त कानात सांगा,” असा टोला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांनी लगावला.
“राहुल नार्वेकर आदित्य ठाकरेंच्या गुरुस्थानी आहेत. नार्वेकरांनी आदित्य ठाकरे यांना शिकवलंय. त्यामुळे आदित्य ठाकरे नार्वेकरांना गुरुदक्षिणा नक्की देतील. शिवसेनेत अजून काही आमदार उरलेत ते गुरुदक्षिणा म्हणून देतील,” असं म्हणत मुनगंटीवारांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
आदित्य ठाकरेंचं सुधीर मुनगंटीवारांना प्रत्युत्तर, म्हणाले…
सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार व आदित्य ठाकरेंना टोला लगावल्यानंतर आदित्य ठाकरेंनीही जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, “सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांना कानात सांगायला पाहिजे होते असं सांगितलं. आम्ही फडणवीसांच्या कानात सांगितलं तसं ऐकलं असतं तर ही परिस्थिती अडीच वर्षापूर्वीच दिसली असती.”
दरम्यान, राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थिर दिसत असतानाच अचानक विधान परिषद निवडणूक झाली आणि शिवसेनेतील बंडाने राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केला. त्यामुळे सुरुवातीला या बंडामागे नेमकं कारण काय याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. यानंतर बंडखोरांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला आणि भाजपाशी जवळीक साधली.
हेही वाचा : कितीतरी भाजपाचे नेते तर ढसाढसा रडायलाच लागले, गिरीश महाजन तर फेटा सोडून… : अजित पवार
तेव्हा भाजपा बंडखोरांसोबत येऊन सरकार स्थापन करेन आणि त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असाही कयास बांधला केला. मात्र, फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं तर आम्हाला सांगायचं आम्ही तुम्हाला या पदावर बसवलं असतं, असा टोला लगावला.