एकीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा प्रकरणावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात असताना दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय नवनवी राजकीय समीकरणं मांडली जात आहेत. कर्नाटकमध्ये जाऊन प्रचार करणारी नेतेमंडळी महाराष्ट्रातील विरोधकांवरही टीका करताना दिसत आहेत. रविवारी सीमाभागातील निपाणीत प्रचारसभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असा केला होता. त्यावरून आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांनी रविवारी निपाणीत प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकच उमेदवार निवडणुकीत दिल्यावरून टीका केली. “महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा एक पक्ष आहे. या पक्षाने आता इथे अख्ख्या कर्नाटकमध्ये त्यांचा एकच उमेदवार दिला आहे. तो उमेदवार निपाणीत आहे. हा पक्ष काय डोंबल करणार आहे इथे येऊन? खरं म्हणजे ही यांची मिली जुली कुस्ती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिली जुली कुस्ती सुरू आहे”, असं फडणवीस म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पॅक करून पाठवून द्या, आम्ही बघून घेऊ, असंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, या टीकेवर आज अजित पवारांना साताऱ्यात पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी खोचक भाषेत प्रत्युत्तर दिलं. “ठीक आहे. त्यांनी आमच्या लोकांची काळजी करण्याचं कारण नाही. जर ३६ जिल्ह्यांपैकी आम्ही साडेतीन जिल्ह्यातले असू तर मग त्यांच्यासमोर कुणी विरोधकच दिसत नाही. कारण शिवसेनेची त्यांनी ती अवस्था केली. आम्ही तर साडेतीन जिल्ह्यातलेच आहोत. काँग्रेसबद्दलपण ते तेच म्हणत असतात. काँग्रेस संपवली पाहिजे अशीच भाजपाची वक्तव्यं असतात”, असं अजित पवार म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळेंना टोला
यावेळी बोलताना अजित पवारांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनाही टोला लगावला. “निवडणुकांनंतरही आमच्या सरकारला धोका नाही”, अशा आशयाचं विधान बावनकुळेंनी केलं होतं. त्यावर अजित पवार म्हणाले, “ठीक आहे. सत्तेत असताना कोण म्हणेल की आमच्या सरकारला धोका आहे. सरकार असेपर्यंत सगळे असंच म्हणणार. फार महत्त्वाची बाब असेल तर आम्ही त्याची नोंद घेऊन त्यावर उत्तर देऊ”.