Ajit Pawar on Sharad Pawar Retirement : “शरद पवार राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर हा पठ्ठ्याच (मी) तुमची कामं करणार, तिथं आपलं नाणं खणखणीत आहे”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. “मी अजून १० वर्षे काम करू शकतो”, असंही अजित पवार म्हणाले. शरद पवार यांनी अलीकडेच संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यावर अजित पवार यांनी शनिवारी (९ नोव्हेंबर) प्रतिपादन केलं. अजित पवार फलटण येथील राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “काल-परवा तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल की शरद पवार म्हणाले आहेत की माझी मुदत संपल्यावर (राज्यसभा सदस्यत्त्वाची मुदत) मी बाजूला होणार आहे. असं त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. मी त्यांना बाजूला व्हा असं म्हटलेलं नाही. त्यामुळे शरद पवार बाजूला झाल्यानंतर किंवा ते राजकारणापासून थोडेसे दूर झाल्यानंतर कामं कोण करणार? तर हा पट्ट्याच कामं करणार. तो दुसऱ्याचा घास नाही. तिथे आपलं नाणं खणखणीत आहे. आम्ही अजून दहा वर्षे काम करू शकतो.
हे ही वाचा >> Video : भाजपा खासदाराचे वादग्रस्त विधान; म्हणे, “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्यास, त्यांचा…”
अजित पवारांकडून फलटण शहराला ग्रीन सिटी बनवण्याचं आश्वासन
“फलटण शहराला ग्रीन सिटी बनवणार. क्रीडा संकुल, शैक्षणिक संकुल, सुसज्ज दवाखाना, कमिन्स या कंपनीतील युवकांना योग्य मानधन, अभ्यासिका, बस स्थानकावर चार्जिंग स्टेशन, भूमिगत वायरिंग, नाट्यगृह अशी कामं आपण मार्गी लावू”,असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे फलटण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं.
अजित पवारांचा महाविकास आघाडीला खोचक प्रश्न
शेतकऱ्यांना मोफत वीज, लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, तीन मोफत गॅस सिलेंडर, दुधाला ७ रुपये अनुदान इत्यादी सर्व योजनांसाठी एकूण ७५ हजार कोटी रुपयांचा निधी आवश्यक होता. जेव्हा महायुती सरकारनं योजना जाहीर केल्या, तेव्हा योजनांसाठी लागणारा पैसा कुठून आणणार, असा प्रश्न महाविकास आघाडीनं उपस्थित केला होता. आता महाविकास आघाडीनं अनेक योजना जाहीर केल्या आहेत, त्यासाठी विरोधक पैसे कुठून आणणार? असा प्रश्न अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा >> “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे?
उपमुख्यमंत्री म्हणाले, सचिन पाटील गरीब कुटुंबातील उमेदवार आहेत. ते अगोदर शिक्षक होते. सध्या ते शेती करत आहेत. त्यांना निवडून द्या, आपण विकास खेचून आणू, हा शब्द देतो. केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे. निधीची कमतरता पडणार नाही.