लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जाहीर सभांना सुरुवात झाली आहे. देशपातळीवर इंडिया आघाडी विरुद्ध भाजपाप्रणित एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) अशी ही लढत रंगणार आहे. परंतु, या दोन्ही आघाड्यांमध्ये अनेक पक्ष असल्यामुळे जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा सुटल्यावर जागावाटप होईल. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, मी जिथं उमेदवार जाहीर करेन, तिथं मीच उभा आहे असं समजून मतदान करा, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. आज (४ फेब्रुवारी) ते बारामतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे. आज सकाळपासूनच त्यांनी बारामतीत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. अजित पवार यांनी दुपारी बारामतीत त्यांच्या पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. त्यापाठोपाठ बारामतीत व्यापाऱ्यांचा मेळावा घेतला. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये बोलताना त्यांनी बारामती लोकसभेत त्यांच्या पक्षाचा (अजित पवार गट) खासदार निवडून आणण्यावर भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील नेत्या सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत. त्यामुळे अजित पवार हे सध्या सुप्रिया सुळेंविरोधात बारामती मतदारसंघात सक्रीय झाले आहेत.

बारामतीत पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, आगामी काळात तुम्ही फार मोठ्या गंभीर समस्येतून जाणार आहात. एकीकडे आमचे वरिष्ठ सांगतायत असं करा, दुसरीकडे अजित सांगतोय तसं करा, अशा वेळी कोणाचं ऐकायचं असा प्रश्न तुमच्यासमोर निर्माण होईल. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना एवढीच विनंती आहे की, इतके दिवस तुम्ही आमच्या वरिष्ठांचं ऐकलंत, आता माझं ऐका. इथून पुढे माझ्या विचारांचा खासदार झाला तर काय होणार आहे? मी तुम्हाला खोटं सांगत नाही, परंतु, माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चांगले संबंध आहेत.

अजित पवार उपस्थितांना म्हणाले, “माझी तुम्हाला विनंती आहे की लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे. त्या निवडणुकीत तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर बारामतीत जो बदल आणि जे काही काम चाललं आहे, मी विकासासाठी जे निर्णय घेतलेत ते लक्षात ठेवा. धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात, हे लक्षात ठेवा.

हे ही वाचा >> “मिरवणुकीत पिस्तुल काढणारा, गोळीबार करणारा…”, आदित्य ठाकरेंनी वाचली शिंदे गटाच्या आमदारांच्या गुन्ह्यांची यादी

बारामतीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी?

अजित पवारांनी बारामतीत लोकसभेचं रणशिंग फुंकल्याने बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना हे आव्हान आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बारामती लोकसभेसाठी अजित पवार गटाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळेल अशा अफवा ऐकायला मिळत होत्या. परंतु, अजित पवारांसह त्यांच्या गटातील कोणत्याही नेत्याने अद्याप यावर त्यांचं मत मांडलेलं नाही. अजित पवार गट या मतदारसंघात कोणता उमेदवार उभा करणार ही गोष्ट अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्याचबरोबर महायुतीत बारामतीची जागा अजित पवार गटाला मिळणार की दुसऱ्या कुठल्या पक्षाला मिळणार हेदेखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar says baramati should have of my thoughts challenge for supriya sule asc
Show comments