Ajit Pawar at NCP convention At Shirdi : “जनमानसात ज्याची प्रतिमा खराब असेल अशा लोकांना पक्षात घ्यायचं नाही” अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. “पक्षातील पदाधिकारी व नेत्यांकडून कोणतेही गैरवर्तन होता कामा नये”, अशा सूचना देखील अजित पवार यांनी पक्षाच्या शिबिरातून नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथे चालू असलेल्या पक्षाच्या नव-संकल्प शिबीर – २०२५ या मंथन शिबिरास आज अनेक नेत्यांनी हजेरी लावत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या शिबिरास उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या.

अजित पवार म्हणाले, “काहीजण असे आहेत जे काहीच कामाचे नाहीत. त्यांना पक्षात घेऊन उपयोगही नाही. उलट त्या लोकांना आपल्या पक्षात घेतल्यामुळे ‘या माणसाला पक्षात का घेतलं?’ असा प्रश्न जनता उपस्थित करेल. ते पाहून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीतरी वेगळं चालू आहे’ अशी चर्चा लोकांमध्ये होऊ शकते. त्यामुळे जनमानसात ज्याची प्रतिमा खराब आहे अशा माणसाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घ्यायचं कारण नाही. त्यांना पक्षात अजिबात घ्यायचं नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सगळ्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे की संघटनेत काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांकडून कुठलंही गैरवर्तन होता कामा नये. आपल्या नेत्यांमुळे, पदाधिकाऱ्यांमुळे कोणालाही त्रास होता कामा नये.

…त्याची पक्षातून हकालपट्टी केली जाईल : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुढचा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहील. गावागावात, चौकाचौकात आपल्या पक्षाचे कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. सर्वांनी समन्वयानं कामं केली पाहिजेत. महाराष्ट्राचा विकास सर्वांनी मिळून साधायचा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आपली जबाबदारी वाढली आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारीसाठी जे इच्छुक आहेत, त्यांनी एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे आणि त्या कार्यकर्त्यानं २५ घरांवर काम कलं पाहिजे. म्हणजे एका घरात ४ मतं धरली तर, १०० मतं मिळतील. आपल्याला अधिकाधिक तरुणांना पक्षात सामील करून घ्यायचं आहे. त्यात डॉक्टर, इंजिनियर, वकील यांचा समावेश असायला हवा, सध्या पक्षात अनेक जण येत आहेत, मात्र पक्षाची बेरीज झाली पाहिजे. पक्षाला कमीपणा यायला नको. जनमानसात प्रतिमा खराब असलेल्या व्यक्तीला पक्षात स्थान नाही. गैरवर्तणूक होता कामा नये. चुकीचं काम करणाऱ्यांची हकालपट्टी केली जाईल,

Story img Loader