Ajit Pawar on Mahayuti Government : “राज्यात महायुतीचं सरकार २४ तास जनतेची कामं करत असतं”, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचं स्वतःचं कामाचं वेळापत्रक देखील सांगितलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, “नीलम गोऱ्हे त्यांच्या भाषणात म्हणाल्या की महायुतीचं सरकार २४ तास काम करतं. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री २४ तास जनतेची कामं करत असतात. यावर तुम्ही (जनता) प्रश्न उपस्थित कराल की हे कसं शक्य आहे, हे लोक झोपतात की नाही? त्यांना एवढंच सांगेन की झोपणारे ठराविक वेळी झोपतात.”
अजित पवार म्हणाले, “मला पहाटे लवकर उठून कामाला लागायची सवय आहे. मी पहाटे चार वाजता उठून माझी कामं आटोपतो. व्यायाम करणे, चालण्यासारख्या गोष्टी करतो आणि लगेच कामाला लागतो. पहाटे चार वाजल्यापासूनच कामाला सुरुवात करतो. त्यानंतर रात्री १०, ११ वाजेपर्यंत मी काम करत असतो. इतर लोक त्यानंतरही काम करत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री ११ ते २ वाजेपर्यंत काम करत असतात. त्यानंतर रात्री २ ते पहाटे चार वाजेपर्यंत दोन तासांची पोकळी निर्माण होते. मात्र, आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं त्यावेळी काम चालतं. अशा पद्धतीने आम्ही २४ तास काम करत असतो. हे सरकार २४ तास लोकांसाठी काम करत असतं.”
राज्यातील आरोग्य प्रणाली सुधारण्यावर आमच्या सरकारचा भर : अजित पवार
दरम्यान, अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून त्याचे अहवाल देखील समोर आले आहेत. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल, याची मी सर्वांना ग्वाही देतो. या प्रकरणातील दोषी शोधणं हे इतकंच महायुती सरकारचं उद्दीष्ट नाही. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संपूर्ण आरोग्य प्रणालीत सुधारणा करणे ही आमची जबाबदारी आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध
उपमुख्यमंत्री म्हणाले, “काश्मीर पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप लोकांवर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला होतो आणि त्यात अनेकजण मारले जातात. अशा घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करावा तितका कमी आहे. मात्र, ज्याच्या डोक्यातून हा कट पुढे आला, त्याला व हल्लेखोरांना पूर्णपणे संपवण्याचं काम आपली भारतीय सेना करेल, याबाबत माझ्या मनात तीळमात्र शंका नाही.”