Ajit Pawar on Bitcoin Scam: पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा आणि निवडणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला. यानंतर भाजपाचे खासदार, प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीचे काही पुरावे सादर केले. ज्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट यांचा समावेश आहे. ऑडिओ क्लिपमध्ये सुप्रिया सुळेंचा आवाज असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर आता बारामती विधानसभेचे उमेदवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदर ऑडिओ क्लिपमधील आवाज माझ्या बहिणीचा असल्याचे ते म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले?
बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुप्रिया सुळेंच्या कथित ऑडिओ क्लिपबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “सदर ऑडिओ क्लिपमध्ये ज्या दोन लोकांचे आवाज ऐकू येत आहेत. त्यांना मी ओळखतो. एक आवाज माझ्या बहिणीचा आहे. तर दुसरा आवाज विधानसभेतील माझ्या एका सहकाऱ्याचा आहे. या सहकाऱ्याने आमच्याबरोबर महाविकास आघाडीत काम केले होते. आता ते विरोधात आहेत. तसेच मधल्या काळात ते भाजपाचे खासदारही होते.”
अजित पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचे थेट नाव घेणे टाळले.
अजित पवार पुढे म्हणाले, या प्रकरणाची सरकारकडून चौकशी केली जाईल. त्यानंतर सत्य समोर येईल. अजित पवार यांची ही प्रतिक्रिया बारामतीमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जाते. बारामतीमध्ये लोकसभेत पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार नाराज होते. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली होती. शरद पवार यांच्यासह त्यांनी कुटुंबातील सदस्यांवरही आरोपांच्या फैरी झाडल्या.
सुप्रिया सुळेंनी आरोप फेटाळले
दरम्यान, सुप्रिया सुळेंनी आज सकाळी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना या आरोपांवर उत्तर दिलं आहे. “एकतर काल संध्याकाळी मला माध्यमांमधून कळलं की असे आरोप झाले आहेत. माझ्या हातात ते व्हॉइस रेकॉर्डिंग आल्यानंतर मी पहिली गोष्ट केली ती म्हणजे पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अर्थात अमितेश कुमार यांना फोन केला. मी त्यांना सांगितलं की काही बनावट रेकॉर्डिंग फिरत आहेत आणि मला सायबर क्राईमकडे तक्रार करायची आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही तक्रार करा. मी काल संध्याकाळीच ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे की या सगळ्या रेकॉर्डिंग्ज आणि मेसेजेस खोटे आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवार काय म्हणाले?
दरम्यान शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “जी व्यक्ती काही महिने तुरुंगात होती, त्याची नोंद तरी कशी घ्यायची? माझ्या मते त्याची नोंदही घ्यायची आवश्यकता नाही”, असं म्हणत शरद पवारांनी भाजपावरही निशाणा साधलाय. ते म्हणाले, “असे आरोप करून भाजपा किती खालच्या पातळीवर जाऊ शकते याचं हे उदाहरण आहे.”
u
हे ही वाचा >> Bitcoin Scam : निवडणुकीत सुप्रिया सुळेंकडून बिटकॉइनचा वापर? भाजपाच्या आरोपांवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
सुधांशु त्रिवेदींविरोधात मानहानीचा दावा
दरम्यान, भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात आपण मानहानीचा दावा केल्याचंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं. “आज सकाळी मी सुधांशु त्रिवेदींना मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यांनी मला पाच प्रश्न केले आहेत. त्यावर त्यांनी मला आव्हान दिलं की बाहेर येऊन उत्तर द्यावं. मी बाहेर येऊन उत्तर द्यायला कधीही तयार आहे. सुधांशु त्रिवेदी ज्या शहरात, ज्या चॅनलवर, ज्या वेळी मला बोलवतील, त्या वेळी मी जाऊन उत्तर देईन. त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर माझं उत्तर असेल ‘नाही’. सगळे आरोप खोटे आहेत. त्यामुळेच मी सायबर क्राईमकडे तक्रार केली आहे आणि नंतर मी अवमान याचिका दाखल केली आहे”, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.