नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली आहे. अजित पवारांचा पक्ष लोकसभेची केवळ एकच जागा जिंकू शकल्यामुळे त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा गट महायुतीत चार जागा लढला होता. मात्र त्यापैकी एकमेव रायगड लोकसभेची जागा जिंकण्यात त्यांना यश मिळालं आहे. सुनील तटकरे येथून निवडून आले आहेत. मात्र एनडीएने केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवारांच्या पक्षाला स्थान दिलेलं नाही. त्यामुळे या पक्षाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर अजित पवार यांनी काही वेळापूर्वी भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी सांगितलं की, एनडीएने आम्हाला राज्यमंत्रिपद देऊ केलेलं. मात्र आम्ही ते नाकारलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “मी भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांच्याशी सातत्याने चर्चा करत आहे. एनडीएची पहिली बैठक झाली तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी आम्हाला सांगितलं होतं की एनडीएबरोबर यावेळी अनेक पक्ष आहेत, त्यामुळे मी प्रत्येकाशी संपर्क साधू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही नड्डा, शाह आणि राजनाथ सिंह यांच्या संपर्कात राहा, ते तुम्हाला वेळ देतील. त्याप्रमाणे आम्ही शाह, नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी या तिघांनी आम्हाला सांगितलं की लोकसभा निवडणुकीत तुमचा एकच खासदार निवडून आला आहे. तरी देखील आम्हाला तुम्हाला मंत्रिपद द्यायचं आहे. आम्ही तुम्हाला स्वतंत्र कार्यभार असलेलं राज्यमंत्रिपद देण्याचा विचार करत आहोत.”

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “त्यांच्या प्रस्तावावर आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल यांचं नाव द्यायचं आहे. पटेल यांनी याआधी अनेक वर्षे केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिलं आहे. इतकी वर्षे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या व्यक्तीने स्वतंत्र कार्यभार असलेलं राज्यमंत्रिपद सांभाळावं हे आमच्या मनाला काही पटत नाही, त्यामुळे तुम्ही यामध्ये वेगळा निर्णय घ्यायला हवा, असं मी त्यांना सांगितलं. त्यावर ते आम्हाला म्हणाले, तुमच्यासारखे इतरही पक्ष आपल्याबरोबर आहेत. एकनाथ शिंदे यांचे सात खासदार आहेत. त्यांनाही आम्ही स्वतंत्र कार्यभार दिला आहे. त्यावर आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं, तुम्हाला शक्य असेल तर आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्या. तरी देखील आम्ही एनडीएबरोबरच राहू. परंतु राज्यमंत्रिपद आम्ही स्वीकारणार नाही.”

हे ही वाचा >> मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळांकडे मोठी जबाबदारी? महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांकडे कोणती खाती?

अजित पवार म्हणाले, “याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या राज्यात आणि देशभरात प्रसिद्ध करण्यात आल्या. या बातम्यांचा विपर्यास करण्यात आला. या बातम्या आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्या. त्यावर कार्यकर्त्यांनी मला फोन किंवा इतर माध्यमातून विचारणा केली. मी त्यावर सर्वांना एकच गोष्ट सांगितली की गैरसमज करून घेऊ नका. उलट एक परिवार म्हणून आपण आपला पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याला कुठेही धक्का लागता कामा नये. आपल्या पक्षाची किंवा आपली विश्वासार्हता कुठेही कमी होता कामा नये. अशा प्रकारे प्रकारची विनंती मी या वर्धापन दिनानिमित्त तुम्हा सर्वांनाही करतो.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar says ncp asked cabinet ministry for praful patel but bjp offered mos asc