राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे दोन गट झाले आहेत. अजित पवारांचा गट भाजपाबरोबर महायुतीत आहे. तर शरद पवारांचा गट हा काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर महाविकास आघाडीत आहे. महाविकास आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रात प्रत्येकी १६ जागा लढवू शकतात. तर दुसऱ्या बाजूला भाजपानेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट हे तिन्ही पक्ष एकत्रित लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अजित पवार यांनी शनिवारी कार्यकर्त्यांशी बोलताना ही बाब स्पष्ट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होतं. या बैठकीनंतर रात्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले, मराठवाड्यात आपल्याला खासदारांची संख्या वाढवायची आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या विचारांच्या आमदारांची संख्या वाढवायची आहे.

अजित पवार म्हणाले, “आधी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. तुमची काय ताकद आहे ते मला या निवडणुकीत कळेल. कुठल्या कुठल्या विधानसभा मतदारसंघात आपण महायुतीचे उमेदवार देणार आहोत ते लवकरच कळेल. परंतु, आपण जमिनीवर पाय ठेवून लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. नुसतं वरवर करून चालत नाही.”

अजित पवार सध्या मराठवाड्यात पक्षबांधणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, शनिवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना लोकसभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हे ही वाचा >> चिखलदऱ्याला जाणाऱ्या पर्यटकांची कार दरीत कोसळली; तिघांचा मृत्‍यू, चारजण जखमी

औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात होता. परंतु २०१९ च्या निवडणुकीत एआयएमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये विजय मिळवला. तसेच या लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघापैकी २ भाजपाच्या तर चार शिवसेनेच्या ताब्यात आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar says ncp will contest lok sabha election 2024 in nda asc