ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी सायंकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्याप्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. विरोधी पक्ष राज्य सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. विरोधक कायदा आणि सुव्यवस्थेवरून थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. काही विरोधकांनी गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशातच, या टीकेला फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले, या घटनेला काही लोक राजकीय रंग देत आहेत, ते योग्य नाही. ही घटना गंभीर असली तरी घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा यांचे एकत्रित बॅनर काही दिवसांपूर्वीच पाहायला मिळाले होते. दोघेही अनेक वर्षांपासून एकत्र काम करत होते. पण अचानक त्यांच्यात इतका बेबनाव का झाला? मॉरिसने अभिषेक घोसाळकरला गोळ्या का घातल्या? आणि त्यानंतर त्याने आत्महत्या का केली? याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, या हत्या प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “दहिसर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा घटना महाराष्ट्रात घडताच कामा नये. त्या घटनेत काही मिनिटांचे व्यवस्थित संभाषण सुरू असल्याचे दिसत आहे. घोसाळकर उठत असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे या घटनेचा नीट तपास झाला पाहिजे. या दोघांमध्ये नक्की काय झालं? हे समोर आयला हवं. या घटनेवरून विरोधक मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करत आहेत. राजीनामा मागण्याचा प्रयत्न केला जाईल. पण चौकशीतूनच तथ्य समोर येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चर्चा केलेली आहे. लवकरच सत्य समोर येईल”.

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात मागच्या महिन्याभरात गोळीबाराची तीन प्रकरणं घडली आहेत. मुळशी येथे काही दिवसांपूर्वी गुंड शरद मोहोळ याच्यावर दिवसाढवळ्या त्याच्याच साथीदारांनी गोळ्या झाडल्या. तर उल्हासनगर येथे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला. काल दहिसरमध्येही अशीच घटना घडली. या तिन्ही घटनांमध्ये आरोपी आणि पीडित हे एकमेकांना ओळखणारे होते. त्यांच्यातील आपसातील वादातून गोळीबार झाला आहे.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, काल झालेली घटना (घोसाळकर यांची हत्या) ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा घटना कुठेही घडू नयेत. बाहेर पोलीस यंत्रणा असेल आणि आत दोन जण बसलेत, ते त्यांच्या धंदापाण्याच्या गोष्टी अतिशय आपलेपणाणे करत आहेत. दोघांचं संभाषण चांगलं चाललंय, नंतर अचानक मॉरिसने ते कृत्य केलं. त्यामुळे या घटनेचा नीट तपास झाला पाहिजे. ती घटना नीट पाहा. दोघं इतके चांगले गप्पा मारतायत चर्चा करतायत. अचानक मॉरिस बाहेर गेला. फेसबूक लाइव्हदरम्यान तो बोलत असताना त्याच्या मनात दुसरं काहीतरी चाललं होतं. आणि तिथून उठल्यानंतर असं करायचं, हे त्याने ठरवलं असलं तरी चेहऱ्यावर मात्र काहीच दिसत नाही.

हे ही वाचा >> अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय

दरम्यान, शस्त्र परवाने देण्यावरून पोलिसांवर टीका होत आहे. या टीकेलाही अजित पवार यांनी उत्तर दिलं. अजित पवार म्हणाले, पोलीस खूप जबाबदारीने शस्त्र परवाना देतात. प्रत्येकाची कारणं जाणून घेतात. गायकवाड प्रकरणाबद्दल बोलायचं झाल्यास ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांना शस्त्र परवाना देणं आवश्यक होतं. त्यामुळेच पोलिसांनी त्यांना बंदुकीचा परवाना दिला. परंतु, काही लोकांनी परवान्याशिवाय शस्त्रं बाळगली आहेत, हेदेखील तितकंच खरं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar says police investigation going on abhishek ghosalkar murder case asc
Show comments