राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाल्यापासून दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अनेकदा हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांनी आज (शुक्रवार, ४ डिसेंबर) पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केली. तसेच त्यांना अप्रत्यक्षपणे निवृत्तीचा सल्ला दिला आहे. अजित पवार आज नाशिक येथे एका कार्यक्रमात बोलत होते. नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे अजित पवार आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत चौथा सुविचार गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, मी काही लेचापेचा नाही, जी वस्तूस्थिती आहे ती बोलणारा माणूस आहे. तुमच्या तोंडावर एक बोलायचं आणि तुमच्या पाठीमागे वेगळं बोलायचं असं मी करत नाही. तुम्ही मागे फिरल्यावर दुसरंच काहीतरी बोलायचं, असं माझ्याकडे चालत नाही. मी अशा प्रकारची व्यक्ती नाही. हे तुम्ही लक्षा घ्या. तुम्ही जर गेल्या ३०-३५ वर्षांमधील माझ्या गोष्टी ऐकल्या तर तुम्हालाही वाटेल की आता या लोकांनासुद्धा संधी दिली पाहिजे आणि या ८०-८५ वर्षाच्या लोकांनी आशीर्वाद देण्याचं किंवा सल्ला देण्याचं काम केलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे.
दुसऱ्या बाजूला, शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं शिबीर चालू आहे. या शिबिरात शरद पवार गटातील बहुसंख्य नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं. त्यांचा गद्दार असा उल्लेख करत, त्यांच्या गटाच्या आमदार-खासदारांना निवडणुकीत जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं. ‘ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची’ असे घोषवाक्य ठेवण्यात आल्याने शिबिराचा रोख अगोदरच स्पष्ट झाला होता. तोच धागा पकडून प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांनी अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केलं. या शिबिरास पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दिवसभर उपस्थित होते. त्यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, खासदार फौजिया खान, खासदार अमोल कोल्हे या शिबिराला हजर होते. तसेच जयंत पाटील, अनिल देशमुख, अशोक पवार, बाळासाहेब पाटील, अरुण लाड, संदीप क्षीरसागर, प्राजक्त तनपुरे, जितेंद्र आव्हाड हे आमदार उपस्थित होते.
हे ही वाचा >> ‘राम मांसाहारी होता’, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर शरद पवार गटाकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले…
“२०१९ मध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री करणं ही चूक होती”
“अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील दादागिरी आम्ही शरद पवार यांच्यामुळेच सहन केली. आता त्यांच्या परतीच्या वाटा बंद करून टाका. २०१९ मध्ये परत आल्यावर, अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करणे ही मोठी चूक होती”, असे मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. तसेच निवडणुका आल्या की रामाचे नाव घेऊन महाराष्ट्र अस्वस्थ केला जातो. तणाव निर्माण केला जातो. आताही रामाचे नाव घेऊन निमंत्रण देणारे तुम्ही कोण आहात, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.