Ajit Pawar in Baramati : “काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे काही चालत नाही”, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. बारामतीमधील एका रस्त्याच्या कामासंदर्भात बोलत असताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. अजित पवारांचं हे वक्तव्य ऐकून उपस्थितांमध्ये एकच हसा पिकला होता.

अजित पवार म्हणाले, “काका कुतवळ यांना मी या रस्त्याबाबत सांगितलं आहे. त्यांना मी म्हणालो आहे की सहकार्य करा. याशिवाय मी तहसीलदार, बीडीओ आणि स्थानिक पोलीस निरीक्षकांना देखील आदेश दिले आहेत. मी त्यांना म्हटलं, काकालाही विश्वासात घ्या. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे काही चालत नाही. काका लोक म्हणजे काका कुतवळ यांना… नाहीतर ही माध्यमं लगेच चर्चा करतील, अजितदादा घसरले.. कोणावर घसरले यावर चर्चा होईल.”

दोन वर्षांपूर्वी अजित पवार यांनी त्यांचे काका व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख (तत्कालीन) शरद पवार यांची साथ सोडली. पक्षातील ४० आमदारांना आपल्याबरोबर घेत त्यांनी वेगळा गट बनवला. तसेच आम्हीच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत असा दावा केला. त्यावर निवडणूक आयोगानेही शिक्कामोर्तब केलं आहे. तसेच या गटासह अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन गट पडल्यापासून अजित पवार हे सातत्याने त्यांचे काका शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पक्ष आणि पक्षफुटीवर किंवा शरद पवारांबद्दल कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. आज त्यांनी काका कुतवळ यांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यानंतर ते त्यांच्या काकांबद्दल बोलतायत की काय असं सर्वांना वाटलं होतं.

चुलत्याच्या कृपेने आमचं बरं चाललंय : अजित पवार

गेल्या आठवड्यात बीड दौऱ्यावर असताना तिथे केलेल्या एका भाषणात अजित पवारांनी त्यांच्या चुलत्याचा म्हणजेच शरद पवारांचा उल्लेख केला होता. आपल्या कार्यकर्त्यांना सल्ला देताना अजित पवार म्हणाले होते, “बोलताना भान बाळगा, पुढाऱ्यांच्या पाया पडायचं असेल तर त्याचा इतिहास आठवा. तसेच माझ्या पाया पडायला येऊ नका, हार, टोप्या, मानचिन्ह काही देऊ नका, चुलत्याच्या कृपेने आमचं बरं चाललं आहे.”

अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांचा गुरुवारी (१० एप्रिल) ऋतुजा पाटील हिच्याशी साखरपुडा झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र आलं होतं. यावेळी शरद पवारांच्या स्वागतासाठी अजित पवार स्वतः मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ उभे होते.