आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही ज्या उमेदवाराला उभा करू त्याला तुम्ही खासदार केलं पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही लोकसभेला आमच्या उमेदवाराला निवडून दिलं तरच मी विधानसभा निवडणुकीला उभा राहीन, अन्यथा मी निवडणूक लढवणार नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. बारामती येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि मतदारांना बारामती लोकसभा निवडणुकीत त्यांच्या गटातील उमेदवाराला जिंकवण्याचं आवाहन केलं. अजित पवार बारामतीकरांना म्हणाले, तुम्ही साथ देणार नसाल तर मला माझा प्रपंच पडला आहे. तुम्हाला काही लोक भावनिक करतील. परंतु, तुम्ही भावनिक होण्यापेक्षा विकासाला साथ द्यायला हवी. आता तुम्हाला विकास हवा आहे की भावनिक व्हायचं आहे ते तुम्हीच ठरवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. लोकसभेपाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. दरम्यान या निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यासह महाराष्ट्रभर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. महायुतीत लोकसभा निवडणुकीत बारामतीचा मतदारसंघ अजित पवार गटाकडे येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारांनी बारामतीत जोरदार प्रचार सुरू केला आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. अजित पवार स्वतः सातत्याने बारामतीत फिरत आहेत. त्यांनी आज बारामतीत तीन मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावली. तसेच तिथे भाषणं केली. या भाषणांदरम्यान त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “बारामतीत उद्या आम्ही ज्या उमेदवाराला उभा करू त्याला तुम्ही विजयी केलं पाहिजे. तरच मी पुढे विधानसभा निवडणुकीला उभा राहीन. मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगतोय. नाहीतर खुशाल मी माझा प्रपंच बघेन. तुम्ही मला साथच देणार नसाल तर मला माझा प्रपंच पडलाय. मला माझे धंदे पडलेत. मी कशाला हे सगळं करू?” यावेळी अजित पवार समर्थकांनी त्यांच्या नावाने घोषणा दिल्या. त्यावर अजित पवार म्हणाले, या घोषणा, तुमची मतं त्या इलेक्ट्रिक (ईव्हीएम) मशीनमध्ये दिसू द्या.

भावनिक व्हायचंय की पुढच्या पिढीची भलं करायचंय? अजित पवारांचा बारामतीकरांना प्रश्न

अजित पवार म्हणाले, उद्या निवडणुकीच्या प्रचारासाठी वेगवेगळे मान्यवर इथे येतील. तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला भावनिक व्हायचं आहे की तालुक्याच्या चाललेल्या विकासाची गती अशीच चालू ठेवायची आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. भावनिक व्हायचं की पुढच्या पिढीची भलं करायचं आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. नाहीतर माझ्यासाठी सगळं बस झालं. तुम्ही मला बस झालं म्हणालात तर आपलं काही म्हणणं नाही. त्यानंतर तुम्ही कितीही सांगितलं तरी मी अतिशय हट्टी माणूस आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी माझ्या पद्धतीने पुढच्या गोष्टी करणार.

“मला एकटं पाडण्यासाठी काहीजण जीवाचं रान करतील”

अजित पवार यांनी सकाळी बारामतीतल्या विकासकामांची पाहणी केली. तसेच त्यांच्या गटातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं. त्यावेळी ते कार्यकर्त्यांना म्हणाले, आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहा, जोमाने प्रचार करा. आमच्या घरात शरद पवार हे एकमेव वरिष्ठ नेते आहेत. बाकीचेही आहेत पण ते पुण्यात असतात. माझं कुटुंब सोडलं तर कदाचित बाकीचे सर्वच जण माझ्याविरोधात प्रचार करतील. कुटुंबातील सर्वजण माझ्या विरोधात गेले तरी ही सर्व जनता माझ्यासोबत आहे. प्रत्येकाला प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु, मला एकटं पाडण्यासाठी काहीजण जीवाचं रान करतील ते बघा.