Ajit Pawar Shares Family Photo After Maharashtra CM Devendra Fadnavis Oath Ceremony : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निकालात महाराष्ट्रातील मतदारांनी महायुतीला तब्बल २३५ जागांवर विजयी केलं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र अवघ्या ४९ जागा मिळाल्या. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर आज (५ डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर महायुतीच्या या तीनही नेत्यांवर राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
यादरम्यान सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण भाग्यवान असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या आपल्या पहिल्या पोस्टमध्ये अजित पवारांनी आपल्या मातोश्रींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला पवारांनी ‘आई’ इतकंच कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये ते त्यांच्या आईला मिठी मारताना दिसत आहेत.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये आजित पवारांनी आपल्या कुटुंबियांसोबतचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये अजित पवार म्हणतात की, “मी खरंच भाग्यवान..! आईचा आशीर्वाद आणि कुटुंबाची मला भक्कम साथ..!”. तसेच त्यांनी पुढे लिहिले की, “आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आईनं, बहिणीनं आणि पत्नीनं औक्षण करून माझं स्वागत केलं. मुलांनी सुद्धा भरभरून शुभेच्छा दिल्या. माझ्यासाठी याहून मोठा आनंद कोणताच नाही”. या फोटोंमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कुटुंबिय सोबत दिसत आहेत.
बारामतीमध्ये जल्लोष
मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमात अजित पवार यांनी उपमुख्यंत्री पदाची शपथ घेतली आणि या पदावर ते सहाव्यांदा विराजमान झाले. यानंतर बारामती येथे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. बारामती शहरातील भिगवण चौकात यानिमित्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार यांचे उपमुख्यमंत्रिपद निश्चित होते. त्यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार समर्थकांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. अजित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.